आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Share Market Issue For Reserve Bank High Intrestrate

रिझर्व्ह बँकेकडून पुन्हा व्याज दरवाढीची बाजाराला धास्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पुन्हा भडकलेल्या महागाईला नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बॅँक पुन्हा व्याजदरात वाढ करण्याची भीती बाजाराला वाटत आहे. त्यातूनच झालेल्या नफारूपी विक्रीच्या मार्‍यात गेल्या चार आठवड्यांत केलेली सगळी कमाई धुऊन निघून सेन्सेक्स गडगडला.

गेल्या महिन्याभरापासून बाजारात आलेल्या तेजीनंतर सेन्सेक्स शुक्रवारी 536 अंकांनी घसरून 19,727.27 अंकांच्या पातळीवर बंद झाला. केवळ रिझर्व्ह बँकेमुळेच नाही, तर अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने तेथील अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी देण्यात येणार्‍या साहाय्यामध्ये अल्पप्रमाणात कपात करण्याचा विचार केला आहे. याबाबतचा निर्णय ऑक्टोबरच्या पुढच्या बैठकीत घेण्याचे संकेत फेडरल रिझर्व्हने 20 सप्टेंबरला दिल्यामुळेदेखील बाजाराचा हिरमोड झाला.

सध्याची भडकलेली महागाई स्वीकारार्ह पातळीच्या वर असून ती कमी होणे गरजेचे असल्याचे सांगत गेल्या आठवड्यात रेपो रेटमध्ये वाढ केली. वास्तविक पाहता नवे गव्हर्नर रघुराम राजन यांच्यामुळे विकासाला गती मिळून व्याजदर कमी होण्याची अपेक्षा बाजाराला होती; पण व्याजदरातील अनपेक्षित वाढीचा बाजाराला मोठा धक्का बसला. दुसर्‍या बाजूला मुडीज या पतमानांकन संस्थेने स्टेट बँकेच्या पतमानांकनात घट केल्याचा मोठा फटका बँकांच्या समभागांना बसला. गुरुवारी डेरिव्हेटिव्हज व्यवहारांची मुदत संपत असल्याने गुंतवणूकदारांनीदेखील आपले व्यवहार आटोक्यात ठेवण्यावर जास्त भर दिला. या सगळ्या नकारात्मक घडामोडींमुळे सेन्सेक्सने साप्ताहिक गटांगळी खाल्ली.

साप्ताहिक आधारावर सेन्सेक्स 20,060.82 अंकांच्या पातळीवर उघडला. दिवसभरात तो 20119.81 आणि 19,658.64 अंकांच्या पातळीत झुलत होता. दिवसअखेर सेन्सेक्स 536.44 अंकांनी घसरून 19,727.27 अंकांच्या पातळीवर बंद झाला; परंतु त्या अगोदरच्या चार आठवड्यांत सेन्सेक्सने 1,744.27 अंकांची कमाई केली होती. राष्ट्रीय बाजारातील निफ्टीचा निर्देशांकदेखील चार आठवड्यांत 540.35 अंकांची वाढ नोंदवल्यानंतर 178.90 अंकांनी घसरून 5833.20 अंकांच्या पातळीवर बंद झाला.

बँक, रिअँल्टीचे शेअर्स आपटले
बँकांना विदेशातून कर्ज उभारण्यासाठी काही नियम शिथिल करण्याचे तसेच आर्थिक यंत्रणेत पुरेशी रोकडसुलभता आणण्यासाठी काही उपाययोजना करण्याचे संकेत रिझर्व्ह बँकेने देऊनदेखील त्याचा काही परिणाम झाला नाही. या आठवड्यात बँक, स्थावर मालमत्ता तसेच रिफायनरी, सार्वजनिक कंपन्या आणि भांडवली वस्तू कंपन्यांचे समभाग आपटले.

टॉप लुझर्स
जिंदाल स्टील, एचडीएफसी बँक, मारुती सुझुकी, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक, भारती एअरटेल, ओएनजीसी, रिलायन्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, टाटा स्टील, महिंद्रा अँड महिंद्रा, एल अँड टी.

टॉप गेनर्स
भेल, सन फार्मा, हीरो मोटोकॉर्प, डॉ. रेड्डीज लॅब.