आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई शेअर बाजाराची नवनेतृत्वाखाली पुन्हा भरारी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुमारे दीडशे वर्षांची परांपरा लाभलेल्या मुंबई शेअर बाजारातील पहिली 120 वर्षे त्यांची मक्तेदारी असल्यासारखी स्थिती होती. मात्र, राष्ट्रीय शेअर बाजार सुरू झाला आणि मुंबई शेअर बाजाराला ख-या अर्थाने स्पर्धा सुरू झाली. कारण मुंबई शेअर बाजाराला स्पर्धा करावी असा दुसरा कोणताही शेअर बाजार अस्तित्वातच नव्हता, परंतु राष्ट्रीय शेअर बाजार स्थापन झाल्यावर मात्र खरी स्पर्धा सुरू झाली. मुंबई शेअर बाजाराची स्थापना हीच मुळी शेअर दलालांनी केलेली असल्याने त्यांची सर्व दैनंदिन कामकाजावर मक्तेदारी होती. याउलट 90 च्या दशकात नव्याने स्थापन झालेला राष्ट्रीय शेअर बाजार ही एक कंपनी होती आणि त्यांचा कारभार पूर्णपणे व्यावसायिक पद्धतीने चालत होता. मुंबई शेअर बाजाराचे संगणकीकरण, कंपनीकरण करण्याची प्रक्रिया मंद गतीने झाली. व्यावसायिकतेच्या अभावामुळे मुंबई शेअर बाजारापेक्षा राष्ट्रीय शेअर बाजार झपाट्याने पुढे गेला आणि गुंतवणूकदारांमध्ये त्यांनी एक आदराचे स्थान मिळवले. आता मात्र चौहान यांच्या नेतृत्वाखाली मुंबई शेअर बाजाराने कात टाकून नव्याने उभारी घेण्याचे ठरवले आहे. सध्याच्या स्पर्धेच्या युगात आता राष्ट्रीय शेअर बाजाराबरोबरच नव्याने स्थापन झालेल्या एमसीएक्सचे आव्हानही मुंबई शेअर बाजाराला पेलायचे आहे.


डेरिव्हेटिव्हचे पितामह
त्यांनी महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत. मुंबई शेअर बाजाराच्या दृष्टीने सर्वात जमेची बाजू म्हणजे त्यांची असलेली ‘ब्रँड व्हॅल्यू’. मुंबई शेअर बाजार आणि ‘सेन्सेक्स’ यांचा बाजारात मोठा दबदबा आहे. राष्ट्रीय शेअर बाजारात जास्त उलाढाल होत असली तरीही त्यांना ‘सेक्सेक्स’ची ‘ब्रँड व्हॅल्यू’ काही कमी करता आलेली नाही. अनेकांना अगदी सर्वसामान्य गुंतवणूकदारांपासून ते अर्थखात्यातील वरिष्ठ अधिकाºयांनाही राष्ट्रीय शेअर बाजारात सर्वाधिक उलाढाल होते याची कल्पना नाही. मुंबई शेअर बाजाराने आपली उलाढाल वाढावी यासाठी तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराशी स्पर्धा करता यावी म्हणून आता आपल्याकडे ‘डेरिव्हेटिव्ह’चे सौदे सुरू केले आहेत. स्वत: चौहान यांना भारतातील ‘डेरिव्हेटिव्हचे पितामह’ म्हणून सर्व गुंतवणूकदार ओळखतात. राष्ट्रीय शेअर बाजारातही त्यांच्याच पुढाकाराने हे सौदे सुरू झाले होते. आता त्यांनी मुंबई शेअर बाजारात हे सौदे सुरू केले आहेत. काही वर्षांत आपण ज्या लघु व मध्यम आकारातील कंपन्यांकडे दुर्लक्ष केले ती बाजारपेठ काबीज करण्याचा मुंबई शेअर बाजाराचा प्रयत्न आहे.


बीएसईमध्ये पाच हजारांवर कंपन्यांची नोंद
मुंबई शेअर बाजारात पाच हजारांच्या वर कंपन्या नोंद झालेल्या आहेत. यातील बहुतांश कंपन्या बहुराष्ट्रीय, मोठ्या व मध्यम आकारातील आहेत. मात्र लघुउद्योगांसाठी भांडवल उभारणी करणे हे मोठे दिव्य असते. आपल्याकडे लघुउद्योग लाखोंच्या संख्येने आहेत आणि ते आपल्या अर्थव्यवस्थेत मोलाची भर घालीत आहेत. परंतु त्यांच्या वृद्धीसाठी त्यांना भांडवल उभारणी करणे गरजेचे ठरते. तसेच गुंतवणूकदारांनाही भांडवलवृद्धीची चांगली संधी मिळते. असे असले तरीही आपल्याकडे शेअर बाजारांनी लघु व मध्यम उद्योगातील कंपन्यांच्या नोंदणी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले नाहीत. मुंबई शेअर बाजाराने हाच धागा पकडण्याचे ठरवले. गेल्या वर्षात या क्षेत्रातील 22 कंपन्या नोंद झाल्या आहेत आणि येत्या वर्षात आणखी दहा कंपन्यांची नोंद होईल. अशा प्रकारे या क्षेत्रातील जास्तीत जास्त कंपन्या नोंद होतील याकडे मुंबई शेअर बाजाराने लक्ष पुरवले आहे. येत्या पाच वर्षांत काही नवीन क्षेत्रे शोधून काढीत किंवा सध्या असलेली उलाढाल वाढवत नेत मुंबई शेअर बाजार पुन्हा एकदा आपले आघाडीचे स्थान कमावण्याचा प्रयत्न करणार आहे. चौहान यांचा राष्ट्रीय शेअर बाजाराच्या यशात मोठा वाटा आहे. त्यांच्या या अनुभवाचा फायदा आता मुंबई शेअर बाजारालाही होईल यात काही शंका नाही.

Prasadkerkar73@gmail.com