आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मरगळीने तेजीला ब्रेक; सेन्सेक्स 108 अंकांनी घसरला, निफ्टीतही घट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सेन्सेक्सने सोमवारी दिलेला 22 हजारी शिखराचा सुखद धक्का फार काळ तग धरू शकला नाही. सकाळच्या सत्रातही सेन्सेक्सने या पातळीवर जाण्याचा प्रयत्न केला; परंतु दुपारनंतर बाजारात झालेल्या विक्रीच्या मार्‍यात 108 अंकांची घसरून पाच दिवसांच्या तेजीला ब्रेक मिळाला.

सोमवारच्या सत्रात जवळपास एक हजार अंकांची उसळी घेत पहिल्यांदाच 22 हजार अंकांचे शिखर ओलांडून सेन्सेक्स 21,935.83 अंकांच्या पातळीवर बंद झाला होता. सकाळच्या सत्रातही सेन्सेक्स दुसर्‍यांदा 22 हजार अंकांच्या पातळीवर गेला होता; परंतु रिलायन्स, एचडीएफसी बँक, टाटा स्टील यांच्या नफारूपी विक्रीचा फटका बाजाराला बसला. मंगळवारी मात्र विक्रीच्या मार्‍यात सेन्सेक्स 108.41 अंकांनी घसरून 21,826.42 अंकांच्या पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक दिवसभरात 6562.85 अंकांच्या कमाल पातळीवर गेला होता; परंतु दिवसअखेर 25.35 अंकांनी घसरून तो 6511.90 अंकांच्या पातळीवर बंद झाला.

चीनची मंदावलेली आर्थिक वाढ, युरोप शेअर बाजारातील नरमाई आणि त्यातच आयात- निर्यातीमध्ये झालेल्या घसरणीचा बाजारावर नकारात्मक परिणाम झाला. गेल्या सात महिन्यांपासून सकारात्मक वाढीची नोंद केल्यानंतर फेब्रुवारीमध्ये निर्यात 3.67 टक्क्यांनी घसरली आहे; परंतु सोने आयात कमी झाल्यामुळे चालू खात्यातील तुटीत झालेली सुधारणा इतकीच काय ती जमेची बाजू होती. बाजारातील पाच दिवसांच्या तेजीचादेखील गुंतवणूकदारांनी फायदा करून घेतल्यामुळे नफारूपी विक्रीचा फटका बसला.