आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्सचा नवा विक्रम; सरकारच्या धोरणाला बाजाराची सलामी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कोणत्या ना कोणत्या तरी सकारात्मक कारणामुळे बाजारातील खरेदीचा उत्साह वाढत आहे. आता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गुंतवणूकदारांना अनुकूल ठरावा असाच आर्थिक कार्यक्रम हाती घेण्याचा विचार केल्यामुळे बाजाराच्या आनंदात आणखी भर पडली. याच आनंदात बाजारात झालेल्या चौफेर खरेदीमध्ये गुंतवणूकदारांची मालमत्ता एक लाख कोटी रुपयांनी तर वाढलीच, पण सेन्सेक्स आणि निफ्टीने नेहमीप्रमाणे नव्या उच्चांकाची नोंद केली.
बाजारात झालेल्या खरेदीत स्थावर मालमत्ता, भांडवली वस्तू, ऊर्जा, धातू, ग्राहकोपयोगी वस्तू आणि वाहन समभागांना मागणी आली. बाजारात झालेल्या 3,100 समभागांच्या व्यवहारात 2,300 समभागांच्या किमतीत लक्षणीय वाढ होऊन गुंतवणूकदारांची मालमत्ता वाढून 90.26 लाख कोटी रुपयांवर गेली.

आशियाई शेअर बाजारातील चांगल्या वातावरणामुळे सेन्सेक्सने मधल्या सत्रात 25,644.77 अंकांनी ऐतिहासिक नवी उंची गाठून दिवसअखेर सेन्सेक्स 183.75 अंकांनी वाढून 25,580.21 अंकांच्या पातळीवर बंद झाला. गेल्या तीन सत्रांत सेन्सेक्सने 774.38 अंकांची कमाई केली आहे. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक 71.20 अंकांनी वाढून 7654.60 अंकांच्या नव्या बंद पातळीवर बंद झाला.

बाजारातील तेजीचे कारणे
० रोजगार निर्मितीवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करून व्यापक आर्थिक विकास घडवण्यास नरेंद्र मोदी यांचे सरकार सर्वाधिक प्राधान्य देणार आहे. त्याचबरोबर आर्थिक विकासाची चक्रे गतिमान करणे, एफडीआयला उत्तेजन देण्याचा सरकारचा मानस असल्याचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यंनी संसदेच्या संयुक्त बैठकीत झालेल्या भाषणात सांगितले. राष्ट्रपतींच्या या भाषणानंतर तमाम गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास दुणावला आणि त्यातूनच जोरदार खरेदी झाली.
० पायाभूत क्षेत्रासाठी भरीव कार्यक्रम, रेल्वेला पुनरुज्जीवन, विद्युत निर्मिती क्षमतेत वाढ, भांडवल बाजारासाठी ठोस कार्यक्रम आदी विविध सकारात्मक संकेतांनी सेन्सेक्सला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले.