मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील सरकारकडून देशाची अर्थव्यवस्था रुळावर येण्याचे संकेत मिळत असल्याने शेअर बाजारात उत्साह संचारला आहे. शेअर बाजाराचा सेंसेक्सने उंच शिखर सर केले तर निफ्टीनेही 8000 अंकांचा टप्पा ओलांडला.
आठवड्याच्या पहिल्या दिवशी अर्थात सोमवारी सेंसेक्स 26,812.69 अंकांवर पोहोचला. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टीनेही पहिल्यांदा आठ हजारांचा टप्पा ओलांडत 8,018.65 अंकांवर पोहोचला आहे.
गेल्या आठवड्यात (28 ऑगस्ट) सेंसेक्स 26,674.38 अंकांवर बंद झाला होता. सेंसेक्समध्ये सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी अर्थात आज (सोमवार) 174.58 अंकांनी वाढ झाला. त्यामुळे सेंसेक्स नवा विक्रम प्रस्थापित करत 26,812.69 अंकांवर स्थिरावला. याप्रमाणेच गेल्या सहा महिन्यांत सेंसेक्समध्ये 323.96 अंकांनी वाढ झाली आहे.
नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा 'निफ्टी' देखील 64.30 अंकांनी वर सरकून 8,018.65 अंकांवर पोहोचला आहे. यापूर्वी 25 ऑगस्टला निफ्टी 7,968.25 अंकांवर पोहोचला होता.
बाजाराच्या विशेषज्ज्ञांच्या मते, एप्रिल, मे, आणि जून या तिमाहीत अर्थव्यवस्थेत सुधारणा दिसून आल्याचा हा सकारात्मक परिणाम आहे. निवडक शेअर्सच्या खरेदीचा जोर वाढल्याने बाजारात तेजी दिसत आहे.