आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारात तेजी, सेन्सेक्सचे शतक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- दलाल स्ट्रीटच्या खेळपट्टीवर सोमवारी ब्ल्यू चिप कंपन्यांच्या शेअर्सनी जोरदार बॅटिंग केल्याने सेन्सेक्सने तेजीचे दमदार शतक ठोकले. हिंदुस्तान युनिलिव्हर, आयटीसी, ओएनजीसी आणि आयसीआयसीआय बँक या समभागांची जोरदार खरेदी झाली. त्यातच रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर कपातीची शक्यता दुणावल्याने बाजारातील तेजीला बळ मिळाले. त्यामुळे सेन्सेक्स 101 अंकांनी वधारुन 19,306.67 वर बंद झाला. निफ्टीने 32.65 अंकांच्या वाढीसह 5,904.1 पातळी गाठली.

हिंदुस्तान युनिलिव्हर, आयसीआयसीआय बँक, हिरो मोटोकॉर्प आणि मारुती सुझुकी या कंपन्यांच्या अपेक्षेपेक्षा चांगल्या तिमाही निकालांनी बाजारात तेजीचा उत्साह दिसून आल्याचे निरीक्षण ब्रोकर्सनी नोंदवले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताचे सकल राष्ट्रीय उत्पादन 2013 मध्ये 5.7 टक्के तर त्यापुढील काळात 6.2 टक्के वाढ होण्याच्या अंदाजानेही गुंतवणूकदारांचा विश्वास वाढवला. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनीही बाजारात जोरदार खेरदी केली. सेन्सेक्सच्या यादीतील 30 पैकी 19 शेअर्स तेजीत आले. कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील शेअर्सपाठोपाठ एफएमसीजी क्षेत्रातील शेअर्स वधारले. रिझर्व्ह बँकेकडून येत्या तीन मे रोजी जाहीर होणार्‍या वार्षिक पतधोरणात व्याजदर कपातीची शक्यता वाढल्याने व्याजदरांशी निगडीत समभागांत तेजी दिसून आली. आशियातील बाजारात संमिर्श वातावरण होते. युरोपातील बाजारात तेजीचे वातावरण होते. अमेरिकेच्या बाजारात सुरुवातीच्या सत्रात सकारात्मक वातावरण होते. त्यामुळेही सेन्सेक्सच्या तेजीला बळ मिळाले.