आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इन्फोसिसला सावरण्यासाठी मूर्ती परतले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - देशातील दिग्गज आयटी कंपनी इन्फोसिसने ढासळत्या आर्थिक परिस्थितीतून सावरण्यासाठी संस्थापक एन.आर. नारायण मूर्ती यांना पुन्हा हाक दिली. मूर्ती यांना 1 जूनपासून पाच वर्षांसाठी कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले. या कामापोटी ते फक्त वार्षिक एक रुपया वेतन घेणार आहेत. 2011 मध्ये मूर्तींनी चेअरमनपद सोडले होते. ऑगस्टमध्ये वयाची 67 वर्षे पूर्ण करत असलेल्या मूर्ती यांनी आता के.व्ही. कामत यांची जागा घेतली आहे.


इन्फोसिस माझ्या मुलासारखी
हा अचानक घेतलेला अनपेक्षित निर्णय आहे. मात्र इन्फोसिस कंपनी माझ्या मुलासारखी आहे. यामुळे मी ही जबाबदारी स्वीकारली आहे. या आव्हानात्मक परिस्थितीत गतवैभव मिळवण्यासाठी मी माझ्याकडून पूर्णपणे प्रयत्न करीन.’’
नारायण मूर्ती, एक्झिक्युटिव्ह चेअरमन, इन्फोसिस


मूर्तींसमोर पाच मोठी आव्हाने
नंबर वनपद मिळवणे
कंपनी पुन्हा देशातील नंबर वन बनवणे. टाटा कन्सलटन्सीने इन्फोसिसकडून हा मुकुट सध्या हिरावून घेतला आहे.
नफा वाढवणे
काही वर्षांत नफा घटला आहे. आयटी उद्योगाचा विकासदर 12-14 टक्के असूनही इन्फोसिस फक्त 6.6 टक्क्यांच्या वेगाने वाढली आहे.
विश्वास बहाल करणे
दोन वर्षांपासून कंपनीने गुंतवणूकदारांना ईपीएस गायडन्स दिला नाही. चालू आर्थिक वर्षात इन्फोसिसचे शेअर्स 4 टक्क्यांनी वधारले.
कर्मचा-यांची काळजी
जानेवारी ते मार्चदरम्यान कंपनी सोडणा-या कर्मचा-यांची संख्या गेल्या दहा वर्षांत सर्वाधिक होती. कंपनीला पुन्हा सर्वोत्तम कर्मचारी मिळवून देणे.
आक्रमकता पुन्हा मिळवणे
गेल्या काही वर्षांत कंपनीने कमाई तर केली, मात्र धोरण बचावात्मक राहिले. नवी कंपनीही विकत घेतली नाही. नावीन्याची उणीव.