मुंबई - भांडवल बाजारातील सध्याची तेजी म्युच्युअल फंड उद्योगाला पोषक ठरत आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता 80 हजार कोटी रुपयांनी वाढून ती 9.85 लाख कोटी रुपयांवर गेली आहे.
देशातल्या 44 म्युच्युअल फंड कंपन्यांच्या व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्तेत नऊ टक्क्यांनी वाढ होऊन ती एप्रिल ते जून या तिमाहीत 9.85 लाख कोटी रुपयांवर गेली आहे. अगोदरच्या तिमाहीत ती 9.05 लाख कोटी रुपये होती, असे असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीत म्हटले आहे. परंतु याअगोदर ही व्यवस्थापनाखालील मालमत्ता मे महिन्यामध्ये 10.11 लाख कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर गेली होती.
शेअर बाजाराने केलेली कमाईही त्याच्याच जोडीला अलीकडच्या काही महिन्यांमध्ये किरकोळ गुंतवणूकदार समभाग योजनांमध्ये जास्त सक्रिय झाल्यामुळे तिमाही कालावधीत व्यवस्थापनाखालील मालमत्तेत लक्षणीय वाढ झाली असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. या तिमाहीत बीएसई मिडकॅप निर्देशांकात लक्षणीय 32 टक्के, तर बीएसई 100 निर्देशांक 15 टक्के आणि सेन्सेक्सने 13 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ नोंदवली. त्याचाही सकारात्मक परिणाम झाला.