आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारातील तेजीने फंड मालामाल, म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापन मालमत्ता ११ लाख काेटींवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - तेजाळलेला शेअर बाजार आणि त्यातच भरभरून येत असलेला भांडवलाचा आेघ म्युच्युअल फंड उद्याेगासाठी फलदायी ठरला आहे. म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता आॅक्टाेबरमध्ये जवळपास विक्रमी ११ लाख काेटी रुपयांवर गेली आहे.

देशातल्या ४५ म्युच्युअल फंड कंपन्यांच्या व्यवस्थापनाखालील सरासरी एकूण मालमत्ता वाढून ती सप्टेंबरमधील ९,५९,४१५ काेटी रुपयांवरून ३१ आॅक्टाेबरअखेर १०,९५,६५३ काेटी रुपयांवर गेली असल्याचे असाेसिएशन आॅफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (अॅम्फी) या संस्थेने जाहीर केलेल्या आकडेवारीमध्ये म्हटले आहे.

शेअर बाजारातील तेजी, भांडवली निधीचा आेघ आणि त्यातही समभाग याेजनांमध्ये किरकाेळ गुंतवणूकदारांचा सहभाग वाढल्यामुळे म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापनाखालील मासिक मालमत्ता लक्षणीय वाढली असल्याचे मत बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.

म्युच्युअल फंड कंपन्यांकडे एकत्रितपणे १.२४ लाख काेटी रुपयांचा आेघ आला. या महिन्यामध्ये सेन्सेक्समध्ये १,२०० अंकांची वाढ झाली. म्युच्युअल फंडांची व्यवस्थापनाखालील मालमत्ता यंदाच्या मे महिन्यात पहिल्यांदाच १० लाख काेटी रुपयांच्या पलीकडे गेली.शेअर बाजारात आलेल्या तेजीमुळे किरकोळ गुंतवणूकदारांचा ओढा म्युच्युअल फंडांकडे वाढला आहे. त्यामुळेच गेल्या काही महिन्यांत फंडांच्या मालमत्तेत वाढ झाली आहे.

कर्जरोख्यांतही विक्रमी गुंतवणूक
म्युच्युअल फंडांनी आॅक्टाेबरमध्ये राेखे बाजारपेठेतही जवळपास ३२ हजार काेटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीपासून एकूण गुंतवणूक जवळपास पाच लाख काेटी रुपयांच्या वर गेली आहे. त्या तुलनेत विदेशी गुंतवणूकदारांनी यंदाच्या वर्षी राेखे बाजारात १.४ लाख काेटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक केली असल्याचे बाजार नियंत्रक ‘सेबी’ची आकडेवारी सांगते. आॅक्टाेबरमध्ये ही गुंतवणूक ३१,९१७ काेटी रुपयांची झाली. त्यामुळे यंदाच्या वर्षात म्युच्युअल फंडांनी राेखे बाजारात आतापर्यंत ५,२७,४३५ काेटी रुपयांची एकूण गुंतवणूक केली आहे.