आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mutual Fund Industry Reaches A Milestone, Investors Happy

म्युच्युअल फंडांत गुंतवणुकीसाठी अजूनही चांगली वेळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई शेअर बाजाराने गेल्या आठवड्यात प्रथमच २८,००० हा स्तर पार केला. आता समभागांत गुंतवणूक करावी, असा विचार मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांच्या मनात घोळतो आहे. ज्यांनी ही तेजी येण्यापूर्वी पहिल्या टप्प्यात गुंतवणूक केली आहे त्यांच्याही मनात काहीसे असेच विचार आहेत. या वेळी त्यांच्या पदरी निराशा पडण्याची शक्यता खूपच कमी आहे. जागतिक स्तरावर खूप काही वाईट घडले नाही तर शेअर बाजारातील ही तेजी एक वर्षभर तरी राहण्याची शक्यता आहे.

सध्याचे चित्र लक्षात घेता वर्ष २०१५-१६ आणि त्यापुछील वर्षात सोने, मुदत ठेवी आणि रिअल इस्टेट (काही शहरांचा अपवाद वगळता) इक्विटीची कामगिरी चांगली राहण्याची शक्यता जास्त आहे. मात्र, जागतिक बाजारातील अनिश्चितता पाहता तसेच शेअर बाजाराविषयी सखोल ज्ञान नसेल तर इक्विटी म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून गुंतवणूक करणे योग्य राहील. म्युच्युअल फंड सुरक्षित तर असतातच, शिवाय ते निर्देशांकांपेक्षा जास्त परतावा देतात. आपल्या देशात इक्विटीमधील गुंतवणुकीचे प्रमाण खूप कमी आहे, त्यामुळे चांगल्या फंड व्यवस्थापकांची कामगिरी सेन्सेक्स, निफ्टी, बीएसई १०० आणि बीएसई ५०० यांसारख्या बड्या निर्देशांकांपेक्षा चांगली राहिली आहे.

सार्वजनिक स्वरूपात उपलब्ध असलेल्या नेट असेट व्हॅल्यूच्या (एनएव्ही) आकडेवारीवर नजर टाकली तर दोनतृतीयांशपेक्षा जास्त भारतीय म्युच्युअल फंडांची कामगिरी त्यांच्या बेंचमार्कपेक्षा चांगली राहिली आहे. मागील तीन वर्षांत ६७ टक्के, पाच वर्षांत ७५ टक्के आणि १० वर्षांत ६४ टक्के फंडांनी आपापल्या बेंचमार्क निर्देशांकांपेक्षा चांगली कामगिरी नोंदवली आहे. याचाच अर्थ तुम्ही कोणत्याही म्युच्युअल फंडांत अगदी डोळे झाकून जरी गुंतवणूक केली तर त्यात तीनपैकी दोन वेळा तुम्ही बरोबर ठरता. मात्र, असेच होईल याची हमी नाही. कारण इक्विटी फंडांसह बाजाराची जोखीम निगडित असते. तरी जोखीम टाळण्यासाठी जर तीन वेगवेगळ्या चांगल्या म्युच्युअल फंडांत गुंतवणूक केली तर बाजारापेक्षा जास्त परतावा पदरी पडू शकतो. मात्र, कोणत्याही फंडांत डोळे झाकून गुंतवणूक करण्याची गरज नाही. कारण व्हॅल्यू रिसर्च आणि क्रिसिलसारख्या रेटिंग एजन्सी फंडांना त्यांच्या दीर्घकालीन कामगिरीच्या आधारे रँकिंग देतात. त्यामुळे सर्वसाधारण गुंतवणूकदारालाही त्याच्या आधारे स्कीमची निवड करणे सुलभ जाते.
मात्र, एक लक्षात ठेवायला हवे की, जगातील ७० ते ८० टक्के म्युच्युअल फंडांची कामगिरी बड्या निर्देशांकांच्या तुलनेत चांगली नसतानाही भारतीय फंडांनी चांगली कामगिरी नोंदवली आहे. याचे मुख्य कारण असे की, अमेरिकेसारख्या देशातील शहरांत म्युच्युअल फंड तसेच पेन्शन फंडांचा आकारच एवढा मोठा असतो की ते बाजाराचा एक हिस्सा बनून जातात. त्यांच्यातील गुंतवणूक सूचकांकातील समभागांचे प्रतिबिंब बनून जाते. या आकारामुळेच त्यातील मोजकेच चांगली कामगिरी नोंदवण्यात यशस्वी ठरतात.

भारतात नेमकी याची उलट स्थिती आहे. एचडीएफसी म्युच्युअल फंडाचे सीओओ प्रशांत जैन यांच्या मते, देशातील सर्वच म्युच्युअल फंड आकाराने खूपच लहान आहेत. एचडीएफसी म्युच्युअल फंड सर्वात मोठी इक्विटी स्कीम असून त्यात १६,००० कोटी रुपयांच्या निधीचे व्यवस्थापन केले जात आहे. एकूण बाजार भांडवलाच्या ०.१७ टक्के एवढे हे प्रमाण आहे. ही स्कीम इतर स्कीमच्या तुलनेत मोठी आहे. मात्र, बाजाराच्या तुलनेत खूपच लहान आहे. जैन यांच्या मते, जवळपास ८० ते ९० टक्के फंडांनी त्यांच्या बेंचमार्कच्या तुलनेत उत्तम कामगिरी बजावली आहे. याचाच अर्थ असा की खूपच खराब स्कीम नसेल तर गुंतवणुकीचा चांगला परतावा मिळू शकतो. थोडक्यात जोपर्यंत म्युच्युअल फंडांचा आकार मर्यादित आहे आणि तो वाढून बाजारातील किमती व स्वत:चा परतावा प्रभावित करणार नाही तोपर्यंत एकूण बाजाराच्या तुलनेत त्यांचे प्रदर्शन उत्तम राहील. याचाच अर्थ असा की, सर्वसाधारण गुंतवणूकदारांसाठी आगामी ४ ते ५ वर्षांत म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी चांगले साधन राहील. जोपर्यंत तुम्ही व्यावसायिक स्टॉक- पिकर होणार नाहीत तोपर्यंत म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक करत राहणे योग्य राहील. थेट शेअर बाजारातील गुंतवणुकीपेक्षा फंडातील गुंतवणुकीत कमी जोखीम असते.

(लेखक आर्थिक विषयाचे ज्येष्ठ पत्रकार, फर्स्टपोस्ट डॉट कॉमचे संपादक आणि डीएनएचे माजी संपादक आहेत.)
rjagannathan@dainikbhaskargroup.com