आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mutual Fund Investment Increases In Small Cities

बचतीचा कल: लहान शहरांतून फंडांतील गुंतवणुकीत ३१ टक्के वाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशातील छोट्या शहरांतील किरकोळ गुंतवणूकदार आता म्युच्युअल फंडाकडे वळत असल्याचे चित्र आहे. असोसिएशन अॉफ म्युच्युअल फंड्स ऑफ इंडियाच्या (अॅम्फी) गुरुवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार म्युच्युअल फंडांच्या एकूण मालमत्तेत छोट्या शहरांतील गुंतवणुकीतून ३१ टक्के वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षातील मार्च ते डिसेंबर या काळात छोट्या शहरांतून फंडात १.८५ कोटी रुपयांचा निधी आला आहे.

अॅम्फीने फंड व्यवस्थापनाच्या सोयीसाठी टॉप -१५ आणि बिआँड -१५ अशी शहरांची वर्गवारी केली आहे. चालू आर्थिक वर्षातील डिसेंबरपर्यंतच्या नऊ महिन्यांतील फंडातील एकूण निधी व्यवस्थापन मालमत्तेची (म्युच्युअल फंड असेट्स अंडर मॅनेजमेंट : एयूएम) आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार बिआँड -१५ शहरातून या मालमत्तेत ३१ टक्के वाढ झाली आहे. डिसेंबरमध्ये फंडांच्या मालमत्तेत बी-१५ शहरांतून १६.३ टक्के निधी आला. मार्च २०१४ मध्ये हे प्रमाण १५.६ टक्के होते. दरम्यान, टॉप-१५ शहरांतून येणा-या अशा निधीचे प्रमाण मार्चमधील ८४.४ टक्क्यांवरून डिसेंबरमध्ये ८३.७ टक्क्यांवर आले आहे.

वाढ का ?
विविध म्युच्युअल फंड कंपन्यांनी गुंतवणूकदारांसाठी घेतलेल्या जागृती कार्यक्रमामुळे छोट्या शहरांतून फंडांत गुंतवणुकीचे प्रमाण वाढले असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले. सेबीनेही या संदर्भात सादर केलेल्या लाभकारी योजनांचाही यात मोठा वाटा आहे.

टॉप -१५ शहरे
म्युच्युअल फंडात मोठी गुंतवणूक ज्या शहरांतून सर्वाधिक होते ती टॉप १५ शहरे अशी : नवी दिल्ली, मुंबई (ठाणे, नवी मुंबईसह), कोलकाता, चेन्नई, बंगळुरू, अहमदाबाद, बडोदा, चंदिगड, हैदराबाद, जयपूर, कानपूर, लखनऊ, पणजी, पुणे आणि सुरत.

फंडांच्या मालमत्तेत वाढ
अॅम्फीच्या माहितीनुसार देशात सध्या ४५ विविध म्युच्युअल फंड कंपन्या आहेत. या कंपन्यांच्या मालमत्ता व्यवस्थापन निधीत गेल्या मार्च ते डिसेंबर या काळात मोठी वाढ झाली आहे. मार्च २०१४ मध्ये या सर्व कंपन्यांकडे ९.०२ लाख कोटी रुपये मालमत्ता निधी होता. डिसेंबरमध्ये तो ११.३४ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

एलआयसीच्या प्रीमियममध्ये २१% घट
भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) प्रीमियम संकलनात २१ टक्के घसरण झाली आहे. चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते डिसेंबर या काळात देशातील या सर्वात मोठ्या विमा कंपनीच्या बाजारातील हिश्श्यात ७० टक्क्यांनी घट आली आहे. या काळात एलआयसीने ५१,६६७.०७ कोटीचा प्रीमियम संकलित केला. गेल्या वर्षी याच काळात एलआयसीने ६५,७७४.४७ कोटींचा प्रीमियम संकलित केला होता. याउलट विमा क्षेत्रातील २३ खासगी कंपन्यांनी नवीन प्रीमियम संकलनात १६.६ टक्के वाढ नोंदवली आहे.