आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फंडात रोख 50 हजारांची गुंतवणूक करता येणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता- सर्व म्युच्युअल फंड कंपन्यांना आता गुंतवणूकदाराकडून वर्षाकाठी प्रतिव्यक्ती 50 हजार रुपयांपर्यंत रोख गुंतवणूक स्वीकारता येणार आहे. भांडवल बाजार नियामक व नियंत्रक सेबीने तशी मुभा दिली आहे. दोन वर्षांपूर्वी सेबीने यासाठी 20 हजार रुपयांची मर्यादा दिली होती.
म्युच्युअल फंडात रोखीने गुंतवणूक करताना धनादेश, धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट), आॅनलाइन हस्तांतरण आणि पॅन कार्ड क्रमांकाच्या आधारे याचा वापर करावा लागतो. रोखीने गुंतवणुकीबाबत असणार्‍या कडक नियमांमुळे अनेकजण इच्छा असूनही फंडातील गुंतवणुकीपासून दूर राहणे पसंत करायचे. सेबीच्या नव्या नियमामुळे गुंतवणुकीच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.

सेबीच्या निर्देशानुसार, अशा व्यवहारांसाठी फंड कंपन्यांनी ठरवून दिलेल्या नियमांचे आणि प्रक्रियांचे पालन करावे. याद्वारे मिळणारा लाभांश बँकांमार्फत देण्यात यावा. विविध उद्योगांकडून करण्यात आलेल्या मागणीनुसार सेबीने हा बदल केला आहे.

नियम होणार सुलभ
सेबीकडून जारी करण्यात आलेल्या दिशादर्शकांनुसार गुंतवणुकीचे नियम सुलभ, सुटसुटीत करण्यात आले आहेत. फंड कंपन्यांनी पैशांच्या स्रोताबाबत तपासणी केल्यानंतरच गुंतवणूकदारांच्या रकमेचा स्वीकार करायला हवा त्यामुळे हवालासारखे घोटाळे टळतील. यामुळे फंडांत गुंतवणूक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.