आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँक समभागांत म्युच्युअल फंडांची गुंतवणूक वाढली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- समभाग बाजारपेठेतील सध्याच्या पोषक वातावरणाचा फायदा उचलताना म्युच्युअल फंडांच्या निधी व्यवस्थापकांनी बॅँक समभागांमधील व्यवहाराचे प्रमाण वाढवले आहे. त्यामुळे आधीच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये म्युच्युअल फंडांनी बॅँक समभागांमध्ये 26 हजार 800 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे.
भांडवल बाजार नियंत्रक ‘सेबी’कडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार म्युच्युअल फंडांची बॅँक समभागांमधील गुंतवणूक 30 सप्टेंबरअखेर 26,838 कोटी रुपयांवर गेली आहे. म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापनाखाली असलेल्या 1.70 लाख कोटी रुपयांच्या एकूण मालमत्तेच्या तुलनेत त्याचे प्रमाण 15.75 टक्के आहे. त्या अगोदर आॅगस्ट महिन्यात बॅँकिंग समभागांमधील म्युच्युअल फंडांच्या गुंतवणुकीने 22,744 कोटी अशी चार वर्षातील नीचांकी पातळी गाठली होती. परंतु गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात ती सर्वाधिक 43.659 कोटी रुपयांवर गेली होती.
रिझर्व्ह बॅँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी बॅँकांच्या आर्थिक यंत्रणेतील खेळत्या भांडवलाची स्थिती सुधारण्याबरोबरच अन्य काही महत्त्वाच्या उपाययोजना केल्यामुळे बॅँकिंग समभागांमध्ये गुंतवणूक करण्याचा कल वाढला. त्यातच शेअर बाजारातील तेजीही त्यासाठी पूरक ठरली.
विशेष म्हणजे सलग चार महिने बॅँकांच्या समभागांची पडझड झाल्यानंतर सप्टेंबर महिन्यात मात्र समभागांनी पुन्हा चढता आलेख ठेवला. परिणामी या महिन्यात बॅँक निर्देशांक देखील 6.4 टक्क्यांनी वाढला. व्याजदर घसरल्यामुळे गेल्या वर्षात प्रामुख्याने बॅँक समभागांमधील निधी तरतुदीचे प्रमाण वाढले होते. यंदाच्या सप्टेंबर महिन्यात बॅँकांच्या पाठोपाठ सॉफ्टवेअर क्षेत्रातही म्युच्युअल फंडांनी जवळपास 23,797 कोटी रुपयांची गुंंतवणूक केली आहे. बिगर ग्राहकोपयोगी, फार्मा आणि पेट्रोलियम उत्पादने या क्षेत्रात अनुक्रमे 13,921 कोटी रुपये, 14,444 कोटी रुपये आणि 9,933 कोटी रुपयांची गुंतवणूक म्युच्युअल फंडांनी केली आहे.