आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फंडांच्या आयटी समभागांवर उड्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - म्युच्युअल फंडांनी गुंतवणुकीसाठी सध्या सॉफ्टवेअर समभागांना जास्त पसंती दिली आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात म्युच्युअल फंडांनी सॉफ्टवेअर क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांमध्ये 28,784 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. विशेष म्हणजे या क्षेत्रातील गुंतवणुकीचा हा नवा उच्चांक आहे.

म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापनाखाली असलेल्या 1.89 लाख कोटी रुपयांच्या एकूण मालमत्तेच्या तुलनेत सॉफ्टवेअर समभागांमधील गुंतवणुकीचे प्रमाण 15.2 टक्के असल्याचे भांडवल बाजार नियंत्रक ‘सेबी’कडे उपलब्ध असलेली आकडेवारी सांगते. त्या अगोदर जानेवारी महिन्यातही सॉफ्टवेअर समभागांमध्ये 27,772 कोटी रुपयांची विक्रमी गुंतवणूक झाली होती. रुपयाचे अवमूल्यन, अमेरिकेतल्या बाजारपेठांमधून पुन्हा मागणीला मिळालेली संजीवनी, गेल्या काही तिमाहींत सॉफ्टवेअर कंपन्यांनी केलेली चांगली कामगिरी या विविध कारणांमुळे सॉफ्टवेअर क्षेत्राला म्युच्युअल फंडांकडून सातत्याने प्राधान्य मिळत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे रुपयाच्या अवमूल्यनामुळे माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या डॉलर मूल्यामध्ये मिळणार्‍या महसुलात वाढ झाली आहे. रुपयाचे मूल्य कमी झाल्यामुळे मेपासून सॉफ्टवेअर समभागांमधील फंडांच्या गुंतवणुकीचा वेग वाढला.

रुपयाच्या मूल्यवाढीचा परिणाम
रुपयाच्या मूल्यवर्धनाबरोबरच टीसीएस, इन्फोसिस, विप्रोसारख्या बड्या कंपन्यांनी तिमाहीत केलेल्या लक्षणीय कामगिरीमुळे म्युच्युअल फंडांकडून सॉफ्टवेअर समभागांमध्ये गुंतवणूक केली जात असल्याचे मत जिओजित बीएनपी परिबास सर्व्हिसेसचे संशोधनप्रमुख अँलेक्स मॅथ्यू यांनी व्यक्त केले. सॉफ्टवेअर बरोबरच म्युच्युअल फंडांचे फेब्रुवारी महिन्यात बँक समभागांमधील गुंतवणुकीचे प्रमाण 17.08 टक्के असून अन्य सर्व क्षेत्रांच्या तुलनेत ते सर्वाधिक आहे. बँक समभागांमध्ये या महिन्यात 32,225 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली.