आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फंडांकडून 14 हजार कोटींची समभाग विक्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात म्युच्युअल फंडांनी 14 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त समभागांची विक्री केली असल्यामुळे सलग पाचव्या वर्षात निधीचा ओघ बाहेर गेला आहे.
आर्थिक वर्ष 2012-13 मधील 22,749 कोटी रुपयांच्या तुलनेत नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात म्युच्युअल फंडांनी तुलनेने कमी म्हणजे
14,208 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली असल्याचे बाजार नियंत्रक ‘सेबी’कडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीमध्ये नमूद केले आहे. 31 मार्च 2014 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात म्युच्युअल फंडांनी समभागांमधून निव्वळ निधी काढून घेण्याचे हे सलग पाचवे वर्ष आहे. 2008-09 या वर्षात म्युच्युअल फंडांने शेअर बाजारात 6,985 कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक केली होती, परंतु त्यानंतर मात्र हा विक्रीचा सपाटा म्युच्युअल फंडांनी कायम ठेवला आहे.
म्युच्युअल फंडांच्या तुलनेत विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून मात्र गेल्या आर्थिक वर्षात जवळपास 80 हजार कोटी रुपयांच्या निधीचा ओघ समभागांमध्ये आला. परंतु कर्ज बाजारपेठेपासून दूर राहण्याचा प्रयत्न करणार्‍या या गुंतवणूकदारांनी रुपयाची घसरण लक्षात घेता नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात 28 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी बाजारातून काढून घेतला आहे.
अलीकडेच संपलेल्या आर्थिक वर्षात म्युच्युअल फंडांनी बारा महिन्यांपैकी दहा महिने निव्वळ विक्रीचीच भूमिका स्वीकारली होती. मे आणि ऑगस्ट या दोनच महिन्यांत मात्र त्यांनी विक्रमी निधी बाजारात आणला. म्युच्युअल फंडांनी या दोन्ही महिन्यांमध्ये अनुक्रमे 3,508 कोटी रुपये आणि 1,607 कोटी रुपयांची गुंतवणूक समभाग योजनांमध्ये केली.
फंडांकडून विक्रीचा मारा
सेन्सेक्सने या आर्थिक वर्षात जवळपास 3,550.50 अंकांची उसळी घेतल्यामुळे म्युच्युअल फंडांनी मोठ्या प्रमाणावर विक्रीचा मारा केला. परंतु याच फंडांनी समभाग बाजारपेठेत सक्रिय राहून 5.43 कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक केली आहे.