‘नॅनो’साठी विक्रीचा मार्ग / ‘नॅनो’साठी विक्रीचा मार्ग बनला खडतर

May 07,2013 12:00:00 AM IST

मुंबई - एक लाख रुपयातील स्वस्त मोटार म्हणून सामान्यांच्या हृदयात स्थान मिळवलेल्या ‘नॅनो’ मोटारीसाठी सध्या विक्रीच्या बिकट मार्गाने प्रवास करावा लागत आहे. या छोटेखानी मोटारीकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याने नॅनोची विक्री घटली आहे. परिणामी यंदाच्या एप्रिल महिन्यात कंपनीला केवळ 948 मोटारींचीच विक्री करता आली.
वाहन बाजारातील एकूणच मंदीचादेखील परिणाम कंपनीच्या कामगिरीवर झाला आहे. गेल्या वर्षाच्या एप्रिल महिन्यात एकूण 8 हजार 28 नॅनो मोटारींची विक्री झाली होती, परंतु यंदाच्या एप्रिल महिन्यात ही विक्री 88 टक्क्यांनी घसरली असल्याचे टाटा मोटर्सने मुंबई शेअर बाजाराला दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे.


टाटा मोटर्सने 2011 पासून श्रीलंकेत नॅनो मोटारींच्या विक्रीला प्रारंभ केला, परंतु गेल्या महिन्यात कंपनीने एकाही नॅनो मोटारीची निर्यात केलेली नाही. त्याचप्रमाणे गेल्या वर्षाच्या एप्रिल महिन्यातही नॅनो सातासमुद्रापार जाऊ शकली नाही.


गेल्या आर्थिक वर्षातही नॅनोची विक्रीची वाट घसरणीची ठरली. ‘सियाम’च्या आकडेवारीनुसार गेल्या आर्थिक वर्षात टाटा मोटर्सच्या नॅनोच्या विक्रीत 27.75 टक्के घट होऊन ती 74 हजार 527 वरून (2011-12) 53 हजार 848 मोटारींवर आली. इतकेच नाही तर निर्यातही 92.21 टक्क्यांनी घसरली आहे.


2011 - 12 वर्षातल्या 3 हजार 462 मोटारींच्या तुलनेत गेल्या आर्थिक वर्षात केवळ 166 नॅनोंची निर्यात झाली. केवळ नॅनोच नाही, तर कंपनीच्या एकूण वाहनांची विक्री घसरली आहे. अगोदरच्या वर्षातल्या एप्रिल महिन्यातील 60 हजार 86 मोटरींच्या तुलनेत यंदाच्या वर्षी याच महिन्यात एकूण वाहनांची विक्री 14.85 टक्क्यांनी कमी होऊन ती 51 हजार 160 वाहनांवर आली आहे. त्याचप्रमाणे स्थानिक बाजारपेठेतील एकूण प्रवासी मोटारींची विक्रीदेखील 48.94 टक्क्यांनी घसरून ती 22 हजार 658 मोटारींवरून 11,570 मोटारींवर आली आहे.


व्यावसायिक वाहनांकडून मात्र टाटा मोटर्सला दिलासा मिळाला आहे. या वाहनांच्या विक्रीत 3.97 टक्क्यांनी वाढ होऊन ती गेल्या महिन्यात 36 हजार 25 वाहनांवर गेली आहे. अगोदरच्या वर्षात याच कालावधीत कंपनीने 34,647 वाहनांची विक्री केली होती.

X