नवी दिल्ली - सरकारने साखरेवरील आयात शुल्कात वाढ केल्याचा परिणाम साखरेच्या किमतीवर दिसून आला. मंगळवारी दिल्लीच्या घाऊक बाजारात साखरेच्या किमती किलोमागे 2 रुपयांनी वाढून 33.40 रुपयांवर पोहोचल्या. किरकोळ बाजारातही साखरचा गोडवा किलोमागे दोन रुपयांनी महागला आहे.
व्यापार्यांनी सांगितले, आगामी काळात साखर आणखी महागण्याची शक्यता आहे. चांगला नफा मिळण्याच्या उद्देशाने कारखानदार सध्या साखर खुल्या बाजारात आणण्याचे टाळत आहेत. सोमवारी 13 हजार गोणी साखरेची आवक झाली होती. मंगळवारी केवळ पाच हजार गोण्या साखर आली. आवकेत 60 टक्के घट आली आहे. याशिवाय उन्हाळा लांबल्याने आईसक्रीम आणि शीतपेये निर्मात्याकडून साखरेला चांगली मागणी असल्यानेही साखर तेजीत आली आहे.
शेतकर्यांची थकबाकी फेडण्यासाठी केंद्र सरकारने साखरेवरील आयात शुल्क 15 टक्क्यांवरून 40 टक्के करण्याचा निर्णय सोमवारी जाहीर केला होता. तर साखर निर्यातीवरील अनुदानाला सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती.
सरकारच्या निर्णयानंतर सोमवारी साखर किलोमागे 60 पैशांनी महागली होती. साखर उत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. असे असले तरी जगात साखरेचा सर्वात मोठा ग्राहकही भारतच आहे.
औरंगाबादेत साखरेच्या किमतीत किलोमागे 60 पैसेच वाढ
केंद्र सरकारने साखरेवरील आयात शुल्क अडीच पटीने वाढवले आहे. यामुळे प्रति क्विंटल साखरेच्या दरात 50 ते 60 रुपयांनी दरवाढ केली आहे. जाड साखर 3200 रुपयांवरून 3250 ते 3260 आणि बारीक साखर 3 हजारांवरून 3070 ते 3090 रुपये झाले आहे.
हरिशंकर दायमा, व्यापारी, जुना मोंढा, औरंगाबाद.
यापुढे दरवाढ नाही
केंद्र सरकारने आयात शुल्क वाढवले आहे. त्यामुळे साखरे दर 60 रुपयांपर्यंत वाढले आहेत. सरकारकडे साखरेचा पुरेसा साठा असल्याने पुढे साखरेचे दर वाढणार नाहीत, असे वाटते.
अनिल सेठ, व्यापारी, जुना मोंढा, औरंगाबाद.