आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Need National Policy For Gold, World Gold Council

सोन्यासाठी राष्ट्रीय धोरणाची गरज- जागतिक सुवर्ण परिषद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जागतिक पातळीवरील सोने बाजारपेठेत व एकंदरीत उद्योगक्षेत्रात भारत केंद्रस्थानी असल्याने देशाच्या आर्थिक विकासाला हातभार लागावा यासाठी भारतातील घराघरांमध्ये पडून असलेल्या २२ हजार टन सोन्याचे मुद्रीकरण (मॉनेटायझेशन) करण्याचे मार्ग शोधले जाणे गरजेचे आहे. त्यासाठी सुवर्ण बचत योजनांसारखी काही गुंतवणूक उत्पादने बाजारात आणण्याबरोबरच गोल्ड एक्स्चेंज स्थापन करता येऊ शकेल या हेतूने राष्ट्रीय सुवर्ण धोरण सरकारने आणण्याची गरज जागतिक सुवर्ण परिषद आणि फ‍िक्की यांनी संयुक्तपणे प्रसिद्ध केलेल्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

गेल्या पाच वर्षांमध्ये सोन्याचा वापर हा सरासरी ८९५ टन (वार्षिक) झाला असून सध्याच्या सोन्याच्या साठ्याच्या तुलनेत हे प्रमाण केवळ ४ टक्के आहे. यापैकी काही टक्के घरगुती सोन्याचे मुद्रीकरण झाले तरी त्याचा सोने आयातीवर परिणाम हाेऊ शकताे, याकडेही व्हाय इंडिया नीड्स अ गोल्ड पॉलिसी या अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे.

प्रभावी सोने धोरणासाठी सात महत्त्वपूर्ण सूचना
-इंडिया गोल्ड एक्स्चेंजची स्थापना करावी, जेणेकरून किमतींचे प्रमाणीकरण केले जाईल, व्यवहारांमध्ये पारदर्शकता वाढेल व पुरवठा-मागणी यांचे विश्लेषण सुधारेल.
-गोल्ड बोर्ड स्थापन केले जावे, जेणेकरून आयातीचे व्यवस्थापन होईल, निर्यातीला प्रोत्साहन मिळेल, भारतीय सोने बाजारपेठ सर्वाधिक क्षमतेने कार्यरत व्हावी यासाठी आवश्यक पायाभूत सोयीसुविधांचा विकास व्हावा.
-आंतरराष्ट्रीय प्रमाणांनुसार प्रमाणित रिफायनरीज विकसित केल्या जाव्यात, त्याचप्रमाणे वर्तमान स्वदेशी रिफायनरीजचा विकास केला जावा.
-लिक्विडिटी रिझर्व्हचा एक भाग म्हणून सोन्याचा उपयोग करण्यासाठी भारतीय बँकांना मंजुरी द्यावी, यामुळे त्यांना सोन्यावर आधारित गुंतवणूक साधने सादर करण्यास प्रोत्साहन मिळेल.
-बँकांना प्रोत्साहन देऊन, गोल्ड डिपॉझिट्स स्कीम्समध्ये सुधारणा घडवून आणून, सोन्यावर आधारित गुंतवणूक तसेच बचत योजना सादर करून सोन्याच्या मुद्रीकरणाला (मॉनेटायझेशन) प्रोत्साहन देणे.
-भारतातील, हाताने घडवण्यात येणा-या दागिन्यांच्या बाजारपेठेसाठी अधिक सक्रिय मार्केटिंग धोरण निर्माण करणे. यामुळे निर्यातीला चालना मिळेल व या अतिशय मौल्यवान व महत्त्वपूर्ण मानल्या जाणा-या उद्योगक्षेत्रात भारतीय कौशल्ये अधिक ठळकपणे मांडली जातील. उदाहरणार्थ, स्विस-मेड वॉचेसप्रमाणे हाताने घडवलेली, इंडिया-मेड ज्वेलरी असे प्रोत्साहन दिले जावे.
-सोन्याच्या प्रमाणीकरणाला चालना मिळावी, जेणेकरून खरेदीदार व विक्रेते या दोघांनाही उत्पादनाची गुणवत्ता व किंमत याबद्दल विश्वास वाटेल. जबाबदारीची भावना वाढावी व विश्वासाचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी सर्व प्रकारच्या सोन्यासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र बंधनकारक केले जावे व त्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या जाव्यात.