आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जरोखे बाजाराच्या विकासाची आवश्यकता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवीन वर्षाची सुरुवात शेअर बाजाराने विश्वासपूर्वक आणि सकारात्मक केली आहे. अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेल्या अर्थ समितीला देशाच्या वित्तीय तोट्यात घट करण्यासाठी आराखडा आखण्याचे महत्त्वाचे काम सोपवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सोने आयातीवर आळा घालण्यासाठी संबंधित करांमध्ये वाढ करण्याची मनीषा अर्थमंत्र्यांनी वर्तवली आहे. जगामध्ये सर्वात जास्त सोने भारतात आयात केले जाते व त्याचा परिणाम भारताच्या वित्तीयन नफा-तोट्यावर होतो. त्या अनुशंगाने सोन्याच्या आयातीवर बंधने आणून इतर आर्थिक उपकरणांवर देशातील पैशाची गुंतवणूक व्हावी व भारताच्या चालू खात्यातील तोट्यात सुधारणा होऊन नफा होण्याकरिता हा निर्णय स्वागतार्ह आहे. त्याचप्रमाणे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) या महिन्यात व्याजदरात कपात करण्याची दाट शक्यता असल्याने शेअर बाजारात गुंतवणूक पोषक वातावरण निर्माण झाले आहे. नवीन बँकांना परवाना मिळण्याची शक्यता असल्याने एकंदर गुंतवणूकदारांमध्ये भारताच्या भवितव्याबद्दल सकारात्मक आशा आहेत. अशा गुंतवणूक पोषक आणि उत्साहवर्धक वातावरणाचा गुंतवणूकदारांनी लाभ घेतला पाहिजे. त्याकरिता शेअर बाजाराबरोबरच इतर गुंतवणूक पर्याय जसे कर्जरोखे बाजार, म्युचुअल फंड, कमोडिटी बाजार, चलनी बाजार व इतर उपलब्ध पर्यायांचा विचार गुंतवणूकदारांनी केला पाहिजे.
भारतात भांडवली बाजार व कर्जरोखे बाजारात होणारी गुंतवणूक ही इतर देशांच्या तुलनेत विरुद्ध आहे. अमेरिकेत 75 टक्के गुंतवणूक कर्जरोखे बाजार (डेब्ट मार्केट) मध्ये होते व 25 टक्के गुंतवणूक भांडवल बाजारात होते, तर भारतात हे चित्र उलटे आहे. 75 टक्के भांडवल बाजार व 25 टक्के कर्जरोखे बाजारात गुंतवला जातो. भारतात कर्जरोखे बाजाराचा विकास पाहिजे तितक्या वेगाने न होण्यामागे मुख्यत: या बाजाराबद्दल गुंतवणूकदारांमध्ये प्रशिक्षण व सुशिक्षिततेचा अभाव कारणीभूत आहे. खरे पाहता कर्जरोखे बाजारात अनेक उपकरणे जसे ट्रेझरी बिल, बाँड्स, डिबेंचरस् आहेत. जे नियमित परतावा व्याजासहित विशिष्ट कालावधीत देत असतात. या गुंतवणूक उपकरणांची मर्यादा 90 दिवसांपासून ते 10 वर्षे, 20 वर्षे असते. या गुंतवणूक पर्यायांचा गुंतवणूकदारांना नियमित व्याजाच्या रूपात परतावा तर मिळतच असतो. तसेच शासनाच्या उपकरणांमध्ये गुंतवणूक करून गुंतवणूकदार आपल्या गुंतवणुकीतील जोखीम कमी करतात म्हणून या शासकीय गुंतवणूक उपकरणांना ‘जोखीममुक्त गुंतवणूक पर्याय’ देखील म्हणतात. त्याचप्रमाणे गुंतवणुकीचा कालावधी कमी असल्यामुळे गुंतवणूकदारांना भांडवल तरलता सांभाळता येते. सर्टीफिकेट ऑफ डिपॉझिट, कमर्शियल पेपर, फिक्स्ड डिपॉझिट या गुंतवणूक उपकरणांचा सुद्धा कर्जरोखे बाजारात समावेश होतो. कर्जरोखे बाजारातील उपकरणांचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे त्यांच्या मोबदल्यात बाँड विकणा-या कंपन्या, बँका त्यांच्या संपत्तीतील काही भाग गुंतवणूकदारांकडे गहाण ठेवत असतात. यामुळे गुंतवणूकदारांना पैसा मिळण्याची शाश्वती असते. त्याचप्रमाणे गुंतवणूदार आपल्या गुंतवणुकीवर कर्ज देखील घेऊ शकतात. तसेच भारतात एनएसई, बीएसई या शेअर बाजारांवर होलसेल डेब्ट मार्केट नावाने एक बाजाराचा प्रकार आहे. त्यावर विविध संस्था, कंपन्या बँकांच्या बाँडमध्ये गुंतवणूक करता येते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या या सोप्या गुंतवणूक पर्यायाचा अभ्यास करून कर्जरोखे बाजारात गुंतवणूक केली पाहिजे व सेबी, आरबीआय यासारख्या बाजार नियंत्रक, नियामक संस्थांनी आणि सरकारने या बाजारात गुंतवणुकीला चालना मिळण्याकरिता व्यवस्थित पावले उचलून गुंतवणूकदारांना साक्षर केले पाहिजे. आणि देशाच्या विकासाकरिता आवश्यक निर्णय घेतले पाहिजेत.

chaitanyavwangikar@gmail.com