आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्यातीची शिडी चढणे कठीण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गेल्या वर्षातील 306 अब्ज डॉलर्सची निर्यातीची पातळी यंदाच्या वर्षात गाठण्याची शक्यता कमी असल्याचा अंदाज वाणिज्य आणि उद्योगमंत्री आनंद शर्मा यांनी व्यक्त केला असून व्यापार तूट चालू आर्थिक वर्षात 193 ते 196 अब्ज डॉलर्सच्या दरम्यान राहण्याचा अंदाज व्यक्त केला.

निर्यातीच्या आकडेवारीकडे बघितले असता गेल्या आर्थिक वर्षातल्या 306 अब्ज डॉलर्सच्या पातळीपर्यंत पोहोचणे आव्हानात्मक असल्याचे शर्मा यांनी व्यापारविषयक उच्चस्तरीय मंडळाच्या बैठकीनंतर बोलताना सांगितले. विदेशी व्यापार धोरण एप्रिलमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने विदेशी व्यापार धोरणासाठी (2009-14) वार्षिक पुरवणी तयार करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याची शिफारस या बैठकीत करण्यात आली. अतिप्रमाणात होणारी आयात आणि कमी निर्यात यामुळे व्यापार तुटीचे आव्हान निर्माण झाले असून त्याचा थेट परिणाम चालू खात्यातील तुटीवर आणि पर्यायाने रुपयावर ताण येत असल्याचे शर्मा यांनी सांगितले. रुपया कमकुवत झाल्यामुळे निर्यातदारांनाही फायदा होत नसून निर्यातदारांनाही त्याची झळ बसत असल्याने अधिक सवलतींची मागणी त्यांच्याकडून होईल याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

आयात-निर्यातीचे गणित बिघडले- यंदाच्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या 11 महिन्यांत व्यापार तूट 182 अब्ज झाली आहे. ही निर्यात मार्च महिन्यात 13 अब्ज किंवा 15 अब्ज डॉलर झालेली असली तरीही व्यापार तूट चालू आर्थिक वर्षात 193 अब्ज डॉलर आणि 196 अब्ज डॉलरच्यादरम्यान राहण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. एप्रिल ते फेब्रुवारी या कालावधीत निर्यात 4 टक्क्यांनी घसरली आहे.