नव्या अ‍ॅप्समुळे स्मार्टफोनच्या / नव्या अ‍ॅप्समुळे स्मार्टफोनच्या विक्रीला गती

वृत्तसंस्था

Apr 24,2012 01:21:20 AM IST

नवी दिल्ली - बाजारात दररोज दाखल होणा-या नवनव्या अ‍ॅप्लिकेशन्स आणि इंटरनेट सुविधांमुळे स्मार्टफोनच्या खरेदीला चांगलाच हातभार लागत आहे. नवे अ‍ॅप्लिकेशन्स ग्राहकांना समार्टफोन खरेदीसाठी प्रोत्साहित करत असल्याचे एरिक्सन कंझ्युमर लॅबच्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. इमर्जिंग कल्चर अ‍ॅप्स नावाच्या या अहवालासाठी भारत, रशिया आणि ब्राझीलमध्ये सर्वेक्षण करण्यात आले.
या अहवालानुसार, चांगल्या इंटरनेटच्या सुविधांमुळे स्मार्टफोन खरेदी केल्याचे 43 टक्के लोकांनी सांगितले. नव्या आणि अधिक अ‍ॅप्सच्या सुविधेमुळे नवा स्मार्टफोन खरेदी केल्याचे 33 टक्के लोकांनी सांगितले. भारत, रशिया आणि ब्राझीलमधील 15 ते 54 वयोगटांतील व्यक्तींचा सर्वेक्षणात समावेश आहे. अ‍ॅप्लिकेशन्सचा वापर कमी संख्येत होत असला तरी, त्याच्या वापरासाठी अधिक वेळ लागतो, ही बाबही समोर आली. इंटरनेटचा वापर दररोज करणाºयांची संख्या 69 टक्के आहे. अ‍ॅप्लिकेशन्सच्या बाबतीत, आठवड्यातून जास्तीत जास्त पाच अ‍ॅप्स वापर होतो. दररोजच्या वापरात सोशल नेटवर्किंगचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. 49 टक्के लोक दररोज सोशल नेटवर्किंगचा वापर करतात. तर 39 टक्के लोक चॅट अ‍ॅप्लिकेशन्स, 31 टक्के लोक हवामानाच्या अंदाजासाठी, 26 टक्के लोक बातम्यांसाठी, 20 टक्के मॅप (नकाशावाचन), जीपीएस आणि नेव्हिगेशन यासाठी तर 12 टक्के लोक वाहतुकीची स्थिती आणि वेळापत्रक जाणून घेण्यासाठी अ‍ॅप्लिकेशन्सचा वापर करतात, असे आढळून आले.
भारत, रशिया आणि ब्राझीलमधील लोकांत अ‍ॅप्लिकेशन्सच्या आवजी भिन्न असल्याचे अहवालातून समोर आले. पर्सनालाइज्ड अ‍ॅप्लिकेशन्सच्या डाऊनलोडिंगमध्ये भारतीय लोकांचा अधिक रस असल्याचे दिसून आले. यात स्क्रीन सेव्हर, लाइव्ह वॉलपेपर,थर्ड पार्टी ब्राउजर, सोशल मीडिया आणि गेम्स अ‍ॅप्स यांचा समावेश आहे. रशियातील लोक स्मार्टफोनचा वापर नकाशा पाहणे, खरेदीच्या दृष्टीने वस्तूंची तुलना करणे, बारकोड स्कॅनिंग, भाषांतर आदी ऍप्स डाऊनलोड करण्यासाठी अधिक करतात. ब्राझीलमधील लोकांचा कल सामाजिक संबंधावर आधारित अ‍ॅप्सकडे अधिक आहे.

X
COMMENT