Home »Business »Business Special» New Business Start Tips

अर्थचक्र वेगाने धावण्यासाठी नवउद्योजकांना योग्य वातावरण हवे

वेणुगोपाल धूत | Jan 07, 2013, 02:00 AM IST

  • अर्थचक्र वेगाने धावण्यासाठी नवउद्योजकांना योग्य वातावरण हवे

‘स्टार्ट अप’ अशी नव्या उद्योगाची ओळख- जागतिकीकरणानंतर उद्योग क्षेत्रामध्ये मोठी क्रांती झाली आहे आणि हजारो नवे उद्योग जागोजाग उभे राहत आहेत. ‘स्टार्ट अप’ अशी या उद्योगांची नवी ओळख आता तयार झाली आहे. अलीकडेच नवउद्योजकांना योग्य वातावरण कोणत्या शहरांत आहे याचा अभ्यास करून एक अहवाल सादर करण्यात आला. अपेक्षेप्रमाणे बंगळुरू आणि दिल्ली परिसराने पहिला क्रमांक पटकावला असला तरी चेन्नई, हैदराबाद, मुंबई आणि पुणे ही शहरेही औद्योगिकदृष्ट्या वेगाने विकसित होत असल्याचे दिसून आले आहे.

बंगळुरू उद्योजकतेत जगात पहिल्या पाच शहरांत - या अहवालानुसार बंगळुरू हे जगातल्या पहिल्या पाच शहरांमध्ये समाविष्ट होईल, असे संकेत मिळत आहेत. याचे कारण बंगळुरूमध्ये असणा-या उद्योजकतेच्या संधी आणि उद्योजकांना उपलब्ध असणारे उच्चशिक्षित, कुशल मनुष्यबळ हे आहे. बंगळुरूचा विकास ख-या अर्थाने सुरू झाला तो 70 वर्षांपूर्वी. हिंदुस्तान एरॉनॉटिक लिमिटेड ही विमान उत्पादन करणारी कंपनी प्रथम बंगळुरूत आली. त्यापाठोपाठ ऑटोमोबाईल उद्योग आणि आयटी कंपन्याही तेथे आल्या. बंगळुरूमध्ये स्थापन झालेल्या आयआयटी आणि आयआयएम संस्थांमुळे आणि उच्च दर्जाच्या इंजिनिअरिंग कॉलेजांमुळे सक्षम मनुष्यबळ या उद्योगांना सहज मिळते. बंगळुरू शहर नोकरीसाठी आणि राहण्यासाठी देशातले सर्वोत्तम शहर ठरल्यामुळे इतर राज्यांतूनही टॅलेंट मोठ्या प्रमाणात इथे आकर्षित होते. संशोधन क्षेत्रात आधीच आघाडीवर असलेल्या बंगळुरूमध्ये जगातल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांची संशोधन केंद्रे उभी राहत आहेत. साहजिकच बंगळुरू नवउद्योजकतेचे नेतृत्व करत आहे.

नॅशनल कॅपिटल रिजनमुळे दिल्लीची मोठी उद्योगवाढ- राजधानी दिल्लीच्या आसपासचा परिसर ‘नॅशनल कॅपिटल रिजन’ या नावाने ओळखला जातो. हा भाग तांत्रिकदृष्ट्या तीन-चार राज्यांत मोडत असला तरी एनसीआर हे स्वतंत्र युनिट मानले जाते. नवी दिल्ली मुख्यत: प्रशासकीय इमारती आणि सरकारी निवासस्थानांनी भरलेले आहे.
साहजिकच दिल्लीची औद्योगिक वाढ एनसीआर क्षेत्रात होते आहे. या भागात शिक्षण, आयटी, उत्पादन क्षेत्र, रिटेल आणि स्वास्थ्य उद्योग या क्षेत्रातील नवे उद्योग वेगाने उभे राहिले आहेत. या परिसरात मोठ्या प्रमाणात गोदामे उभी राहिली असल्यामुळे उत्तर भारतातील वस्तूंचे वितरण इथूनच होते. साहजिकच वाहतूक उद्योगही मोठ्या प्रमाणात उभा राहिला आहे. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमुळे एनसीआर विभाग आणखी वेगाने प्रगती करणार आहे.

राज्यात मुंबई-पुण्यातच उद्योग एकवटले - महाराष्ट्र हा उद्योग क्षेत्रात नेहमीच प्रगतिपथावर राहिला आहे, पण राष्ट्रीय पातळीवर मुंबई आणि पुणे या दोनच शहरांची नावे उद्योजकतेसाठी घेतली जातात. मुंबई ही गेले शतकभर देशाची आर्थिक राजधानी राहिली आहे. बहुतेक मोठे उद्योग मुंबईमध्ये एकवटले असले तरी ते बहुतेक कौटुंबिक उद्योग आहेत. त्यांना मोठी परंपरा आणि बहुराष्ट्रीयत्वाचा मानही आहे. नवे उद्योग मात्र असा कोणताही वारसा नसलेल्या लोकांकडून सुरू केले जातात आणि त्यांनाही मुंबईत मोठा वाव मिळतो आहे. अशा उद्योगांत रिटेल, ग्राहकोपयोगी उत्पादने, वित्तसेवा आणि पर्यटन हे उद्योग महत्त्वाचे आहेत.

बंगळुरूला आव्हान देण्याची ताकद पुण्यामध्ये- बंगळुरूला आव्हान देण्याची ताकद पुण्यामध्ये आहे, असे या अहवालात म्हटले आहे. पुण्यात इंजिनिअर्स, व्यवस्थापनतज्ज्ञ, आयटी कर्मचारी आणि इतर उच्चशिक्षित पदवीधर मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. नवनवीन उत्पादने डिझाइन करण्याची क्षमताही या शहरात आहे हे नॅनो आणि स्प्लेंडरसारख्या उत्पादनांनी दाखवून दिले आहे. पुण्याच्या औद्योगिक वाढीमध्ये मूलभूत सोयींची कमतरता आणि वीजपुरवठ्यातील अडचणी आडव्या येत आहेत.

स्पर्धेत आता चेन्नई आणि हैदराबादही - नवउद्योजकतेसाठी योग्य वातावरण तयार करण्याच्या स्पर्धेत आता चेन्नई आणि हैदराबाद ही दोन्ही शहरेही मागे नाहीत. चेन्नईमध्ये ऑटोमोबाइल उद्योग मोठ्या प्रमाणात प्रवेश करत आहेत. त्याबरोबर तंत्रज्ञानावर आधारित अनेक नवे उद्योग उभे राहत आहेत. हैदराबादमध्ये गेल्या तीन वर्षांत शेकडो नवे उद्योग उभे राहिले आहेत.

औरंगाबाद, नाशिक, सोलापूर उद्योग नकाशावर नाही - महाराष्ट्राच्या दृष्टीने विचार करायचा तर नागपूर, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर अशी शहरे अजून राष्ट्रीय औद्योगिक नकाशावर का येत नाहीत याचा गंभीरपणे विचार होणे आवश्यक आहे. नागपूरमध्ये नव्यानेच आलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्या आणि नागपूर विमानतळावर उभी राहिलेली कार्गो सेवा पुढील वाटचालीत महत्त्वाची ठरणार आहे. नाशिक, कोल्हापूर आणि सोलापूर ही शहरे प्रगत होत असली तरी त्यांना मोठ्या उद्योगांच्या पाठबळाची गरज आहे. औरंगाबादमध्ये असे मोठे उद्योग आहेत, पण त्याभोवती जेवढ्या प्रमाणात नवे उद्योग उभे राहायला हवेत तेवढे राहिलेले नाहीत. या सर्व शहरांत पायाभूत सुविधांची उभारणी आणि अखंडित वीजपुरवठा महत्त्वाचा ठरणार आहे.
वेणुगोपाल धूत
लेखक व्हिडिओकॉन समूहाचे अध्यक्ष आहेत.

Next Article

Recommended