आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवा ‘कार’नामा, राजेशाही मोटारींची मुंबईत मांदियाळी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रस्त्यावरून जाताना लक्झरी मोटारींचे दर्शन झाले तर फारसे काही वाटत नाही; पण फेरारी, रोल्स राइस, बेंटलेसारखी मोटार समोरून आल्यानंतर मात्र त्या मोटारीचा राजेशाही थाट बघण्यासाठी आपोआपच पाय थबकतात. पण या मोटारीचे सौंदर्य डोळ्यांत साठवण्याआधीच ती झर्रकन डोळ्यांसमोरून निघून जाते. मुंबईत 26 जानेवारीला महालक्ष्मी रेसकोर्सवर जवळपास 100 सुपरकारची मांदियाळी जमणार असून त्यामध्ये मोटारप्रेमींना ‘याचि देही याचि डोळा’ दर्शन घेता येणार आहे.

गौतम सिंघानिया यांच्या संकल्पनेतून 2009 मध्ये ही अनोखी रॅली साकारली. तेव्हापासून हा देशातील एक खास शो झाला आहे. यंदाच्या वर्षी जवळपास शंभर सुपर कार या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. सुपरकार क्लबचे संस्थापक अध्यक्ष, रेमंड्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया यांच्या हस्ते यंदाच्या पार्क्स सुपरकार शोचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी होणारे संचलन आणि वार्षिक सुपरकार शो हे आता गेल्या काही वर्षांपासूनचे मुंबईतले जानेवारी महिन्यातील समीकरण झाले आहे. मोटारप्रेमींना एकाच ठिकाणी आपल्या पसंतीच्या मोटारी बघण्याची अनोखी पर्वणी मिळेल, असे सिंघानिया यांनी या शोची माहिती देताना सांगितले.
पर्वणी दोन दिवसांची
गेल्या वर्षीपर्यंत पार्क्स सुपरकार शो फक्त एक दिवसापुरता मर्यादित होता, परंतु या प्रदर्शनाला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद लक्षात घेऊन यंदाच्या वर्षी मोटारप्रेमींना दोन दिवस आलिशान मोटारी बघण्याचा आनंद लुटता येणार आहे. 26 जानेवारीला महालक्ष्मी रेसकोर्सच्या पोलो ग्राउंडवर या अलिशान मोटारी पाहता येतील.
असा असेल मार्ग
महालक्ष्मी रेसकोर्स (प्रारंभ) , नरिमन पॉइंट, मरिन ड्राइव्ह, वाळकेश्वर, मलबार हिल, कमला नेहरू पार्क, कॅम्प्स कॉर्नर, ब्रीच कँडी, हाजी अली, वरळी सी फेस, सहारा स्टार, कलिना, वरळी सी लिंकवरून पुन्हा रेसकोर्स.
हनू मिकोला विशेष आकर्षण : यंदाच्या कार शोला वर्ल्ड चॅम्पियन रॅलीतील निवृत्त चालक हनू मिकोला यांना विशेष आमंत्रित करण्यात आले आहे.