आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवीन रोजगार निर्मितीला वेग; ‘नोकरी डॉट कॉम’चा अहवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- नवीन नोकर भरतीमध्ये फेब्रुवारी महिन्यात बर्‍याच प्रमाणात सुधारणा झालेली आहे; परंतु निवडणुकांच्या अनिश्चिततेचे वातावरण निवळल्यानंतर या प्रक्रियेला आणखी गती येण्याचा अंदाज ‘नोकरी डॉट कॉम’ या संकेतस्थळाने एका अहवालात व्यक्त केला आहे.

डिसेंबरच्या तुलनेत नोकरभरतीचे प्रमाण यंदाच्या जानेवारीमध्ये 13 टक्क्यांनी वाढले होते; परंतु हेच प्रमाण जानेवारीच्या तुलनेत तीन टक्क्यांनी वाढले आहे. मागील वर्षातल्या फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत नोकरभरतीचे प्रमाण 10 टक्क्यांनी वाढले आहे. नोकरी डॉट कॉम संकेतस्थळाच्या ‘जॉब स्पीक इंडेक्स’ या निर्देशांकाने हा कल दाखवला आहे. या निर्देशांकामध्ये नवीन नोकर्‍यांमध्ये मासिक तसेच वार्षिक आधारावर वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे.

‘नोकरी डॉट कॉम’ संकेतस्थळाची मालकी असलेल्या इन्फो एज इंडिया लि.चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हितेश ओबेरॉय यांच्या म्हणण्यानुसार, जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यामध्ये नवीन नोकर्‍यांचे प्रमाण काहीसे सुधारले आहे, तरीही यंदाचे निवडणूक वर्ष असल्याने कंपन्यांनी सध्या थांबा आणि वाट पाहा धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे निवडणुकांचे अनिश्चिततेचे वातावरण संपल्यानंतर नोकरभरतीला आणखी वेग येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. निवडणुकांच्या अनिश्चिततेचे वातावरण निवळल्यानंतर या प्रक्रियेला आणखी गती येणार आहे.

नोकर भरतीत सुधारणा झालेली क्षेत्रे
0वाहन, भांडवली वस्तू, तुलनेने कमी सुधारणा झालेली क्षेत्रे : बँक, वित्तीय आणि बिझनेस प्रोसेस आऊटसोर्सिंग
0माहिती तंत्रज्ञान सॉफ्टवेअर आणि बांधकाम क्षेत्रातील नोकरभरतीचा निर्देशांक लक्षणीय सात टक्क्यांनी घसरला असून विमा क्षेत्रातही काहीसा घसरणीचा सूर दिसून आला आहे.
0बँका, विमा, लेखा आणि वित्त या क्षेत्रातील व्यावसायिकांची मागणी सातत्याने वाढत असून प्रकल्प व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मात्र फेब्रुवारी महिन्यात घसरणीचा कल दिसून आला आहे.