आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव वर्ष गुंतवणूकदारांसाठी देईल चांगला परतावा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नुकत्याच संपलेल्या वर्षात ‘सेन्सेक्स’ने लक्षणीय 9 टक्के परतावा देतानाच 21 हजारी शिखरही सर केले. नवीन वर्ष गुंतवणूकदारांसाठी चांगले ठरणार असून सेन्सेक्स 15 ते 20 टक्के परतावा देऊ शकतो. विविध घडामोडींचा नीट अभ्यास करून चांगली गुंतवणूक केल्यास हा परतावा पदरात पाडून घेता येईल, असा सल्ला गुंतवणूक तज्ज्ञांनी दिला आहे.
अर्थव्यवस्थेची कुर्मगती, महागाईच्या झळा, अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत सुधारणांचे संकेत मिळाल्यानंतर फेडरल रिझर्व्ह आर्थिक मदत कार्यक्रम आवरता घेण्याची भीती अशा सगळ्या परिस्थितीत विदेशी गुंतवणूकदारांनी भांडवल बाजाराची साथ सोडली नाही. वर्षभरात जवळपास 20.1 अब्ज डॉलरची भरभरून गुंतवणूक विदेशी गुंतवणूकदारांनी केल्यामुळे मोठा आधार मिळून तेजी कायम राहण्यास मदत झाली. विशेष म्हणजे यंदा सोन्यापेक्षाही चांगला परतावा भांडवल बाजाराने दिला आहे.
रुपयाचे लक्षणीय अवमूल्यन, अमेरिकेसह युरोपातील अर्थव्यवस्थेत होत असलेली सुधारणा निर्यातधिष्ठित क्षेत्रांसाठी लाभदायक ठरली. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान, औषध तसेच बॅँकिंग समभागात पुन्हा तेजी परतली आहे. त्यामुळे समभागांच्या किमती वाढलेल्या दिसत आहेत, परंतु या समभागांनी अगोदर गाठलेल्या कमाल पातळीपासून अद्याप ही क्षेत्र लांब असल्याचे मत गुंतवणूक तज्ज्ञ केदार ओक यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केले.
माहिती तंत्रज्ञान, औषध आणि बॅँक या तीन क्षेत्रातील समभागांच्या किमती वाढल्या असल्याने नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात याच क्षेत्रात नफारूपी विक्रीचा कल राहणार आहे. त्यामुळे कदाचित बाजारात एक हजार अंकांनी करेक्शन होऊन सेन्सेक्स 19,000 ते 19,500 अंकांवर येण्याची शक्यता आहे.
आगामी लोकसभा निवडणुका, अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हचा रोखे खरेदी कार्यक्रम या दोन महत्त्वाच्या घटना बाजाराला कलाटणी देणा-या ठरणार आहेत. फेडरल रिझर्व्हच्या निर्णयाचा बाजाराला फार मोठा फटका बसणार नाही. फार तर त्यामुळे 800 ते 1000 अंकांचे करेक्शन येऊ शकते. पहिल्या आठवड्यात साधारणपणे नफारूपी विक्रीचा कल राहील. भांडवल बाजारात 2003 मध्ये ज्याप्रमाणे तेजीला सुरुवात झाली होती. अगदी त्याचप्रमाणे 2013 मध्ये तेजीला सुरुवात झाली असून 2017 मध्ये ही तेजी कमाल पातळीवर जाण्याची शक्यता आहे, परंतु पुढच्या सहा महिन्यांतील घडामोडींवरच बाजाराच्या हालचाली अवलंबून राहणार आहेत. लोकसभा निवडणुकांनंतर केंद्रात स्थिर सरकार यावे अशीच बाजाराची अपेक्षा आहे. तसे झाल्यास सेन्सेक्स 23500 ते 24000 अंकांपर्यंत झेप घेऊ शकेल, असा अंदाजही केदार ओक यांनी व्यक्त केला.
गुंतवणूकदारांनी काय करावे
० येणा-या तीन महिन्यांतील बाजाराच्या हालचाली लक्षात घेऊन गुंतवणूक करावी
० गुंतवणूक करताना या तीन महिन्यांतील सेन्सेक्स तसेच समभाग किमती यांच्या कमाल / किमान पातळीचा अभ्यास करून निर्णय घ्या.
० बाजारात होणा-या करेक्शनचा फायदा घेऊन सामान्य गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करावी.
० सध्या तेजीत असलेल्या समभागांमध्ये नवीन गुंतवणूक शक्यतो टाळावी
० 2013 मध्ये तेजीला सुरुवात झाली असून 2017 मध्ये ही तेजी कमाल पातळीवर जाण्याची शक्यता आहे.