आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज अर्थसंकल्प : नव्या रेल्वे, मार्ग जाहीर होणार, उत्पन्न वाढीवर भर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अर्थसंकल्पाच्या अगोदरच प्रवासी आणि मालवाहतूक भाड्यात केलेल्या वाढीनंतर रेल्वेमंत्री सदानंद गौडा आपल्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये नवीन रेल्वेगाड्या, रेल्वेमार्ग जाहीर करताना वास्तविक भूमिका घेतानाच महसूल वाढीवर जास्त भर देतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

प्रवासी भाडेवाढीतील महसूल घटत असून सध्या 26 हजार कोटी रुपयांची रोख चणचण जाणवत असल्याने चालू आर्थिक वर्षात अतिरिक्त महसूल कसा मिळेल या दृष्टीने धोरण राबवण्यावर रेल्वे अर्थसंकल्पात जास्त विचार होण्याची शक्यता आहे. अनेक शक्य नसलेले रेल्वे प्रकल्प रद्द करून गौडा मंगळवारी सादर होणार्‍या रेल्वे अर्थसंकल्पात प्राधान्य तत्त्वावर काही नवीन प्रकल्पांची घोषणा करण्याची शक्यता आहे.

इंधनाच्या वाढत्या खर्चाचा विचार करता सरकार सौरऊर्जा आणि बायोडिझेलसारख्या पर्यायी इंधनांचा भविष्यात मोठ्या प्रमाणावर वापर करण्याची श्क्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील रेल्वे क्षेत्रात अपारंपरिक ऊर्जेचा वापर करण्यावर भर दिला असल्यामुळे त्या दृष्टीने काही ठोस घोषणा होण्याची शक्यता आहे.

या तरतुदी शक्य
- धावत्या गाडीतून पडून होणारे अपघात टाळण्यासाठी मुंबईतल्या उपनगरीय गाड्या तसेच शताब्दीच्या डब्यांना स्वयंचलित बंद होणारे दरवाजे
- विविध धार्मिक स्थळांना जोडणार्‍या नवीन गाड्यांची तरतूद
- रेल्वे पायाभूत सुविधांचा विस्तार, वेगवान गाड्या, रेल्वेस्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी ‘एफडीआय’ आकर्षित करण्याच्या दृष्टीने धोरण
- रेल्वेस्थानकांचा विकास यासारख्या गोष्टींसाठी रेल्वे क्षेत्रात खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन