आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्स 26 हजारांवर, खरेदीचा पाऊस, निफ्टीचाही नवा उच्चांक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार दहा जुलैला सादर होणार्‍या केंद्रीय अर्थसंकल्पात वृद्धिधिष्ठित धोरणांना प्राधान्य देईल, अशी बाजाराची अपेक्षा आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून बाजारात आलेल्या तेजीत सौदापूर्ती सप्ताहाच्या पहिल्या दिवशी आणखी भर पडली. बाजारात झालेल्या तुफान खरेदीमध्ये सेन्सेक्सने इतिहासात पहिल्यांदाच 26 हजारांचे शिखर तर गाठले, पण 138 अंकांच्या वाढीची नोंद करीत सलग दुसर्‍या सत्रात चढती कमान कायम राखली.

निफ्टी 35.55 अंकांनी वाढून 7787.15 अंकांच्या पातळीवर बंद झाला. निफ्टीचाही हा उच्चांक आहे. आता गुंतवणूकदारांच्या नजरा रेल्वे अर्थसंकल्पावर आहेत.

सावध पावले हवीत
केंद्रीय अर्थसंकल्पाकडून गुंतवणूकदारांना विशिष्ट क्षेत्रांशी निगडित अपेक्षा आहेत. त्या पूर्ण झाल्यास बाजारातील तेजी कायम राहील आणि निफ्टीदेखील नजीकच्या काळात आठ हजारांच्या शिखरावर जाईल, परंतु आता बाजार अत्युच्च पातळीवर असल्याने सावध भूमिका बाजाराने अगोदरच घेतली असल्याचे मत बोनान्झा पोर्टफोलिओचे वरिष्ठ उपाध्यक्ष राकेश गोयल यांनी व्यक्त केले.

रुपया पुन्हा ‘साठी’त
बँकांकडून डॉलरला मोठी मागणी आल्याने सोमवारी रुपयाचे मूल्य घसरले. डॉलरच्या तुलनेत रुपया 29 पैशांनी घसरून 60.01 पर्यंत घसरला. हा रुपयाचा तीन आठवड्यांचा नीचांक आहे. जागतिक पातळीवर डॉलरला मागणी असल्याचा फटका रुपयाला बसल्याचे फॉरेक्स डीलर्सनी सांगितले.