आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक लाख कोटी कर्जवाटपाचे बँक ऑफ महाराष्ट्रचे उद्दिष्ट

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- बँक ऑफ महाराष्ट्रने येत्या आर्थिक वर्षात राज्यात 1 लाख कोटी रुपयांच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. यातील 50 हजार कोटींचे कर्ज कृषी क्षेत्राला देण्यात येणार आहे. कृषी कर्जात प्रथमच एवढी मोठी वाढ करण्यात आली असून सर्वाधिक कृषी कर्जाचे वितरण पीक कर्जापोटी केले जाणार आहे.

‘‘गेल्या वर्षी आर्थिक मंदीची लाट असूनही बँकेचा एकूण व्यवसाय 27.88 टक्क्यांनी वाढून 1 लाख 70 हजार 734 कोटी रुपयांवर गेला. मार्च 2014 पर्यंत 2 लाख 30 हजार कोटींचा व्यवसाय करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे,’’ असे बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक नरेंद्र सिंह यांनी सांगितले. 2012-13 या आर्थिक वर्षातील बँकेच्या कामगिरीचा आढावा घेत असताना ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी 2014 मधल्या उद्दिष्टांची माहितीही त्यांनी दिली.

यंदाच्या दुष्काळी पार्श्वभूमीवर पीक कर्ज वितरणावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. पीकनिहाय पीक कर्जवाटपावर भर असणार आहे. यात प्रामुख्याने जळगाव (केळी), नाशिक (कांदा), मराठवाडा-विदर्भ (कापूस) आणि सोलापूर-नगर (डाळिंब) या भागातील पीककर्जाची रक्कम वाढवली जाणार असल्याचे नरेंद्र सिंह म्हणाले. उसावरील पीक कर्जाचा विनियोग ठिबक सिंचनासाठी व्हावा, यावर अधिक भर दिला जाणार आहे. या दृष्टीने प्रमुख ठिबक संच उत्पादक कंपन्यांशी बोलणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

रोजगाराच्या संधी
येत्या आर्थिक वर्षात देशात 272 नव्या शाखा उघडल्या जाणार असून यातील निम्म्या शाखा महाराष्ट्रामध्ये सुरू होतील. येत्या वर्षात एवढय़ा प्रमाणात शाखा उघडण्यात आल्यास मोठय़ा प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील. एटीएम केंद्रांची संख्या 1125 ने वाढवण्यात येणार आहे. या सर्व विस्ताराच्या योजना लक्षात घेऊन यंदा बँक ऑफ महाराष्ट्रच्या वतीने राज्यात दोन हजार अधिकारी-कर्मचार्‍यांची भरती केली जाईल, असे नरेंद्र सिंह यांनी सांगितले.

2012-13 मधील महाराष्ट्र बँकेची प्रगती
> गेल्यावर्षीच्या तुलनेत एकूण उत्पन्नात 34 टक्क्यांनी वाढ होऊन ते 2,671 कोटी झाले.
> बँकेचा निव्वळ नफा 76.29 टक्क्यांनी वाढून 759.52 कोटींवर गेला.
> बँकेचा ‘एनपीए’ 0.84 टक्क्यांवरून 0.52 टक्क्यांपर्यंत कमी झाला.
> 94 हजार 337 कोटी रुपयांच्या एकूण ठेवी बँकेकडे आहेत.