आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रुपयाच्या अवमूल्यनाने सेन्सेक्स, निफ्टीचेही धाबे दणाणले...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गेल्या दोन दिवसांमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये सुधारणा झाल्यामुळे बाजाराला थोडाफार दिलासा मिळाला आहे; परंतु रुपयाचे सातत्याने अवमूल्यन सुरू असल्याने बाजारातील विक्रीचा मारा कायम राहून सेन्सेक्सने सलग पाचव्या आठवड्यात घसरण कायम ठेवली आहे. गेल्या पाच आठवड्यांत सेन्सेक्स 1,630.41 अंकांनी घसरला आहे.

रुपयाच्या अवमूल्यनाबरोबरच विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी भांडवल बाजारातून निधी काढून घेण्याचादेखील परिणाम बाजारावर झाला. बाजारात झालेल्या विक्रीचा प्रामुख्याने हेल्थकेअर, वाहन, स्थावर मालमत्ता आणि बहुराष्‍ट्रीय कंपन्या या समभागांना फटका बसला; परंतु धातू, माहिती तंत्रज्ञान आणि सार्वजनिक कंपन्यांच्या समभागांना चांगली मागणी आली.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशंक 18,587.38 अंकांच्या खालच्या पातळीवर उघडला; परंतु तो त्यानंतर सेन्सेक्सने 18 हजार अंकांच्या खाली 17,759.59 पातळीवर जाऊन पोहोचला. गेल्या वर्षाच्या सप्टेंबरनंतर पहिल्यांदाच सेन्सेक्सने इतकी खालची पातळी गाठली होती. दिवसअखेर सेन्सेक्स 78.74 अंकांनी घसरून 18,519.44 अंकांच्या पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक 36.10 अंकांनी घसरून 5471.75 अंकांच्या पातळीवर बंद झाला. गेल्या पाच आठवड्यांत निफ्टीची 557.45 अंकांनी पडझड झाली आहे.

जवळपास 11 महिन्यांनंतर सेन्सेक्स कामकाजाच्या मधल्या सत्रात 18 हजारांच्या पातळीखाली गेला. रिझर्व्ह बँकेने कडक पावले उचलूनही रुपयाने गुरुवारी पासष्टी गाठल्याचा परिणाम बाजारावर प्रामुख्याने झाला; परंतु आर्थिक वृद्धीला चालना देणे यावर केंद्र सरकारचा मुख्य भर असेल, असे वित्तमंत्र्यांनी दिलेला दिलासा आणि चीनमधील सकारात्मक आकडेवारी याचा परिणाम म्हणजे कामकाजाच्या अखेरच्या सत्रात खरेदीचा पाठिंबा मिळाला. परिणामी सेन्सेक्सने पुन्हा 18,587.38 अंकांच्या पातळीवर झेप घेतली. बँकिंग यंत्रणेत पुरेसे खेळते भांडवल आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने नव्याने जाहीर केलेल्या उपाययोजनांनीदेखील बाजाराला दिलासा मिळाला.

घसरण का ?
रुपयाची सातत्याने सुरू असलेली घसरण आणि अमेरिकेतील मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह पुढील महिन्यात रोखे खरेदी कार्यक्रम थांबवण्याची शक्यता या दोन्ही नकारात्मक घडामोडींचा भांडवल बाजाराच्या मानसिकतेवर परिणाम झाल्याचे मत बाजार विश्लेषकांनी व्यक्त केले.