आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन वर्षांत सोने 21,500! रूपयांवर जाणार, तज्ज्ञांचा अंदाज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - लग्नसराई सरल्याने सोन्याची मागणी कमी झाली. त्यातच सोन्यावर अनेक सरकारी बंधने आल्याने सोन्याच्या किमतीत पुन्हा घसरण सुरू झाली आहे. गेल्या तीन सत्रांत सोने एक हजार रुपयांहून अधिक घसरले. येत्या दोन वर्षांत, 2015पर्यंत सोन्याच्या किमती तोळ्यामागे 21,500 रुपयांपर्यंत घसरण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. नजीकच्या काळात सोने 26,000 रुपयांच्या खाली येण्याची शक्यता आहे. एप्रिल-मे महिन्यात सोन्याच्या किमती मोठ्या प्रमाणावर घसरल्या होत्या. त्या घसरणीतही सोने 26,200 रुपयांपर्यंतच खाली आले होते.
सोमवारी सोन्याची किमत तोळ्यामागे 100 रुपयांनी घसरून 27,200 पर्यंत खाली आली, तर चांदी 43,000 रुपये किलो या स्तरावर होती. तिकडे, मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (एमसीएक्स) बाजारात मंगळवारी सोने 320 रुपयांच्या घसरणीसह 27,320 रुपयांवर आले, तर चांदी किलोमागे 800 रुपयांनी घसरून 41,500 झाली.


जागतिक स्तरावर सोन्याच्या किमतीत मोठ्या घसरणीचे संकेत
सोन्याबाबत सर्व बाजूंनी नकारात्मक संकेत मिळत आहेत. त्यामुळे आगामी काळात सोने तोळ्यामागे 26,000 रुपयांपेक्षा स्वस्त होण्याची शक्यता आहे. रॉबिन या गुंतवणूक सल्लागार फर्मच्या मते, जागतिक बाजारात 2015 पर्यंत सोन्याच्या किमतीत सध्याच्या 1278 डॉलर प्रतिऔंस या किमतीत 22 टक्के घसरणीची शक्यता आहे. जागतिक बाजारपेठेत दोन वर्षांत सोने प्रतिऔंस 1000 डॉलरची पातळी गाठण्याची शक्यता आहे. असे झाले तर भारतीय बाजारात सोन्याची किंमत तोळ्यामागे 21,500 रुपये होईल. गोल्डमॅन सॅक्सच्या मते, येत्या काही दिवसांत सोने 1200 डॉलरच्या पातळीखाली येण्याचे संकेत आहेत. सोशिएट जनरलच्या मते 2014 मध्ये सोने प्रतिऔंस 1150 डॉलर होण्याची शक्यता आहे.


चीन फॅक्टर
गोल्डमॅन सॅक्सने चीनचा विकास दर कमी राहण्याचा अंदाज वर्तवला. त्यानंतर बेस मेटल्समध्ये गतीने घसरण झाली. त्याचा परिणाम सोने-चांदीसह सर्व प्रमुख धातूंवर झाला.


सोन्यातील घसरण नेमकी कशामुळे
मजबूत डॉलर
रुपयाच्या तुलनेत डॉलर सातत्याने बळकट होतो आहे. रुपयाची घसरण सुरूच राहण्याची
शक्यता . परिणामी गुंतवणूकदार सोन्यातील गुंतवणूक डॉलरमध्ये वळवत आहेत.
सरकारी बंधने
सोने आयातीवर सरकारने अनेक बंधने घातली. रिलायन्स मनीने पोस्ट ऑफिसमार्फत होणारी सोने विक्री बंद केली. आगामी काळात बँकाही सोने विक्री बंद करण्याची शक्यता आहे.
फेडरल रिझर्व्ह
अमेरिकेची स्थिती सुधारण्यासाठी फेडरल रिझर्व्हने दिलेली आर्थिक मदत परत घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बाजारात मंदी येण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदार सोन्याची विक्री करताहेत.