नवी दिल्ली - आगामी काळात सोने आणखी स्वस्त होण्याची शक्यता आहे. डॉलर मजबूत झाल्याने सोने घसरण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील सुधारणा यामुळे डॉलरचे मूल्य चांगलेच वधारले असून इतर चलनांच्या तुलनेत ते वाढत आहेत. जागतिक सराफ्यात सोने सध्या औंसमागे (२८.३४ ग्रॅम) ११३७.४० डॉलर या साडेचार वर्षांच्या नीचांकावर आहे. वित्तीय सेवा कंपनी एबीएन अॅमरोच्या मते, या वर्षअखेरपर्यंत सोने ११०० डॉलरच्या खाली येईल. वर्ष २०१५ च्या अखेरीस ते औंसमागे ८०० डॉलरपर्यंत घसरण्याची शक्यता आहे.
याचा परिणाम देशातील सराफा बाजारात दिसून येईल. विदेशात किमती ११०० डॉलरच्या खाली आल्या तर
आपल्याकडे सोन्याच्या किमती तोळ्यामागे २४ ते २५ हजारांदरम्यान राहतील. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने ८०० डॉलरपर्यंत घसरल्यास आपल्याकडे सोने २० हजारांपर्यंत घसरू शकते. बुधवारी देशातील सराफ्यात सोने ३० महिन्यांनंतर २६ हजार या पातळीच्या खाली घसरले होते. दिवाळीत सोने २८ हजारांच्या आसपास होते. पंधरवड्यातच सोने १९५० रुपयांनी घसरून २५,९०० रुपयांवर आले आहे. याच काळात चांदीही ३८,९०० रुपयांवरून घसरून ३५,०५० रुपयांवर आली. गेल्या १५ दिवसांत सोने ७ टक्क्यांनी, तर चांदी ९.८ टक्क्यांनी घसरली आहे.
एबीएन अॅमरोचा अंदाज । २०१५ पर्यंत जागतिक बाजारात सोने औंसमागे ८०० डॉलरपर्यंत घसरणार
सोन्याची घटती मागणी
* २०१२ ४,५८५.२ टन
*२०१३ ४,०६५.२ टन
*२०१४ (जूनपर्यंत) २,०५२.२ टन
अशा घसरणार किमती
महिना जागतिक मूल्य देशातील किमती
डिसेंबर२०१४ ११०० डॉलर / औंस २४ ते २५ हजार
डिसेंबर२०१५ ८०० डॉलर / औंस २० हजार /तोळा