मुंबई - पुढील वर्षाच्या जानेवारीपर्यंत महागाई निर्धारित आठ टक्क्यांपर्यंत येण्याची शक्यता असल्यामुळे रिझर्व्ह बँक फेब्रुवारी महिन्यापासून व्याजदरात कपात करण्यास सुरुवात करेल, असा अंदाज ‘बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंच’च्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन पुढील वर्षामध्ये फेब्रुवारीपासून व्याजदरात पाऊण टक्क्यांनी कपात करतील, असे बीओएफएने म्हटले आहे. किरकोळ महागाई जानेवारीपर्यंत आठ टक्क्यांच्या स्वीकारार्ह पातळीवर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँक व्याजदरात पाऊण टक्क्यांनी कपात करेल, असा अंदाज आहे.
जानेवारी २०१६ मध्ये व्याजदर सहा टक्क्यांवर येईल अशी शक्यता आहे; परंतु दोन डिसेंबरला होणा-या आढावा बैठकीत व्याजदर पुन्हा जैसे थे राहतील, असा सूर आळवला जात आहे. कमी होणारी महागाई, उशिरा झालेला पाऊस, फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढवण्याची अपेक्षा या घटकांसह दर कपातीसाठी पोषक वातावरण तयार होण्याची अपेक्षा आहे.