आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nifty At One month High, Sensex Ends Above 19,000

सेन्सेक्स 19 हजारांवर, व्याजदर कपातीच्या शक्यतेने गुंतवणूकदारांत उत्साह

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- व्याजदर कपातीच्या शक्यतेने तसेच नव्या विदेश व्यापारी धोरणातील चालना देणा-या तरतुदींमुळे खुश झालेल्या गुंतवणूकदारांनी गुरुवारी मुंबई शेअर बाजारात जोरदार खरेदी केली. त्यामुळे सेन्सेक्सने 285.30 अंकांच्या भरारीसह पुन्हा 19 हजारांचा पल्ला पार केला. निफ्टीनेही 94.40 अंकांच्या वाढीसह 5,783.10 अंकांची पातळी गाठली. ग्राहकोपयोगी टिकाऊ वस्तू, भांडवली वस्तू आणि बँकिंग क्षेत्रातील समभागांची मोठी खरेदी झाली.

शेअर बाजारातील 1300 समभागांत तेजी दिसून आली. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 70,000 कोटींची भर पडली. निर्यातीला चालना देण्यासाठी सरकारने नवे विदेश व्यापार धोरण जाहीर केले. त्यात भांडवली वस्तू निर्यात प्रोत्साहन योजना सर्व क्षेत्रांसाठी लागू करणे व विशेष आर्थिक क्षेत्रासाठी दिलासादायक तरतुदी जाहीर केल्या. तसेच महागाईने नीचांकी स्तर गाठल्याने रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर कपातीची शक्यता दुणावली. त्यामुळे गुंतवणूकदारांत उत्साह दिसून आला. व्याजदराशी निगडित एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, एसबीआय, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा या समभागांना चांगली मागणी होती. एल अँड टी, भारती एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटीसी, ओएनजीसी या शेअर्सनाही चांगली मागणी होती.


बाजारातील 13 पैकी 12 क्षेत्रीय निर्देशांकात 2.78 टक्क्यांपर्यंत तेजी दिसून आली. केवळ बीएसई-आयटी निर्देशांक घसरला.
जागतिक स्तरावर आशियातील प्रमुख बाजारांत संमिश्र कल होता. कमोडिटीच्या घसरत्या किमती आणि अमेरिकन कंपन्यांच्या खराब आर्थिक निकालाचा परिणाम आशियातील बहुतेक शेअर बाजारांवर दिसून आला. हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया आणि तैवान बाजार घसरणीसह तर चीन व जपानमधील बाजार तेजीसह बंद झाले. युरोपातील बहुतेक वाजारांत प्रारंभीच्या सत्रात तेजी दिसून आली. फ्रान्सचा कॅक 0.91 टक्के, जर्मनीचा डॅक्स 0.58 टक्के आणि इंग्लंडचा एफटीएसई 0.25 टक्क्यांनी तेजीत होते.

निफ्टीची 5800 पातळी महत्त्वाची
सोने व तेलाच्या किमतीतील घसरणीमुळे खालच्या पातळीवर बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. निफ्टीची 5800 ही पातळी महत्त्वाची आहे. या पातळीवर काही प्रमाणात नफेखोरी होण्याची शक्यता आहे. राकेश गोयल, वरिष्ठ उपाध्यक्ष, बोनान्झा पोर्टफोलिओ

सोने घसरणीचा लाभ
सोने व तेलाच्या घसरणीमुळे चालू खात्यातील तूट कमी होईल आणि रिझर्व्ह बँक प्रमुख व्याजदरात कपात करेल या आशेने बाजारातील तेजीला बळ दिले आहे. तसेच राजकीय पातळीवर सर्व स्थिर असल्याने शेअर बाजारात तेजीचे वातावरण आहे.
नागजी के. रिटा, सीएमडी, इन्व्हेंचर ग्रोथ