आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिसेंबर 2014 पर्यंत निफ्टी गाठणार 6,481 चा टप्पा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भांडवल बाजारातील अस्थिर मानसिकता आणि अन्य काही घडामोडींमुळे पुढील वर्षात भांडवल बाजारात चढ-उतार राहून निफ्टी पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत 6,481 अंकांची पातळी गाठेल, असा अंदाज बार्कलेजने व्यक्त केला आहे.
अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याची शक्यता असली तरी आणखी काही वर्षे गुंतवणुकीचे चक्र मात्र मंदावलेलेच राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे कंपन्यांच्या नफ्यातील घटही कायम राहण्याची शक्यता आहे. अशा वातावरणात आमची बचावात्मक भूमिका कायम राहणार आहे. सध्याच्या पातळीवर केवळ चांगला समभाग परतावा अपेक्षित असल्याचे बार्कलेजने आपल्या एका संशोधन अहवालात म्हटले आहे.
यंदाच्या सप्टेंबरपासूनच भांडवल बाजाराने लक्षणीय कामगिरी केली आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी फेडरल रिझर्व्हने सुरू केलेला रोखे खरेदी कार्यक्रम गुंडाळण्याची बाजाराला वाटत असलेली भीती दूर झाली असल्याचे यावरून दिसून येते. त्यातूनही आता लोकसभा निवडणुकांनंतर स्थिर सरकार केंद्रात येण्याचे बाजारात आशावादी चित्र निर्माण झाले असल्याचे मत या जागतिक पातळीवरील ब्रोकिंग कंपनीने व्यक्त केले आहे.
भांडवल बाजारात आलेल्या तेजीमुळे यंदा सप्टेंबरपासून राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीच्या निर्देशांकात 733 अंकांपेक्षा जास्त वाढ झाली आहे.
दोन सप्टेंबरला निफ्टी 5550.75 अंकांच्या पातळीवर होता आणि आता 23 डिसेंबरला या पातळीत वाढ होऊन निफ्टी 6284.50 अंकांवर गेला आहे.
रुपयाच्या घसरणीचा फटका
रुपयाच्या अवमूल्यनाचा कंपन्यांना फटका बसूला असून त्याचा कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे कॉर्पोरेट पातळीवर नरमाईचे वातावरण कायम आहे. त्यामुळे 2014 च्या अखेरपर्यंत निफ्टी 6,481 ची पातळी गाठेल, असा बचावात्मक पवित्रा कायम राहील, असेही या अहवालात म्हटले आहे.
निवडणुका निर्णायक
लोकसभा निवडणुकानंतर अस्थिर राजकीय परिस्थिती निर्माण झाल्यास रुपयाचे अवमूल्यन, बँकांच्या थकीत कर्जाची जोखीम या गोष्ट्री मात्र नकारात्मक ठरू शकतात; परंतु चार राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांमधील भाजपचा विजय, जीडीपीत भक्कम सुधारणा आणि भांडवली खर्चात सुधारणा या घडामोडी बाजाराला ऊर्जा देणार्‍या ठरतील, असे अहवाल सांगतो.