आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वस्त कर्जासाठी आणखी कळ सोसा, प्रमुख व्याजदर जैसे थे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्च्या तेलांच्या किमतीत झालेली घसरण, कमी झालेली महागाई यामुळे प्रमुख व्याजदर कमी होण्याच्या अपेक्षांवर रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा पाणी फेरले. वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्याजदर कमी करण्याची शिफारस केली होती, परंतु महागाईच्या लढ्याला प्राधान्य देण्याच्या मुद्द्यावर गव्हर्नर रघुराम राजन ठाम राहिले. रिझर्व्ह बँकेने मंगळवारी जाहीर केलेल्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात सलग पाचव्यांदा व्याजदर कपातीला खो दिला. त्यामुळे सध्याचा रेपो रेट आठ आणि रिव्हर्स रेपो रेट सात टक्के कायम ठेवला आहे, परंतु नियंत्रणात येत असलेली वित्तीय तूट, घटत्या महागाईचा सूर असाच कायम राहिला तर पुढील वर्षाच्या सुरुवातीला व्याजदर कपात होण्याचे संकेत दिल्यामुळे थाेडाफार दिलासा मिळाला आहे.

सध्याच्या परिस्थितीत नाणेनिधी धोरणात बदल करणे खूप अगोदर केल्यासारखे होईल, परंतु महागाईची सध्याची घसरण अशीच कायम राहिली, आर्थिक विकास प्रोत्साहनजनक राहिला तर पुढील वर्षाच्या प्रारंभी नाणेनिधी धोरणात बदल होण्याची शक्यता रघुराम राजन यांनी द्वैमासिक नाणेनिधी धोरण आढावा जाहीर करताना सांगितले. महागाईच्या मुद्द्यावर राजन यांनी महागाईचा दर आणखी घसरून तो सहा टक्क्यांवर येण्याची अपेक्षा व्यक्त करतानाच पुढील बारा महिन्यांच्या कालावधीत हंगामी घडामोडी वगळता महागाई सहा टक्क्यांच्या आसपास राहील, असे स्पष्ट केले.

रिझर्व्ह बँकेने जानेवारी २०१५ पर्यंत ग्राहक किमतीवर आधारित निर्देशांक आठ टक्के आणि त्यानंतर जानेवारी २०१६ पर्यंत तो सहा टक्क्यांवर आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यामुळे पुढचे वर्ष हे साध्य करता येण्यासारखे, परंतु २०१६ च्या लक्ष्याबाबत थोडी जोखीम असल्याचे या अगोदर स्पष्ट केले होते. राजन कपातीचा निर्णय घेतील, ही सरकारची अपेक्षा फोल ठरली.