नवी दिल्ली - सणांच्या हंगामावर आशा ठेवून असलेल्या बहुतांश वाहन कंपन्यांच्या पदरी निराशा आली आहे. मारुती-सुझुकी, महिंद्रा अँड महिंद्रा, फोर्ड, निस्सान या कंपन्यांच्या विक्रीत घट दिसून आली, तर
होंडा, ह्युंदाई या कंपन्यांच्या विक्रीत चांगली वाढ दिसून आली.
मारुतीच्या विक्रीत १.१ टक्के घट
देशातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी मारुती-सुझुकीच्या ऑक्टोबरमधील विक्रीत १.१ टक्के घट आली आहे. कंपनीच्या या महिन्यात १,०३,९७३ कारची विक्री झाली. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये कंपनीच्या १,०५,०८७ कारची विक्री झाली होती. कंपनीच्या स्विफ्ट, इस्टिलो, रिट्झ, डिझायर या कारच्या विक्रीत ३.५ टक्क्यांनी घसरण झाली आहे.
महिंद्राची विक्री घटली
महिंद्रा अँड महिंद्राने यंदाच्या ऑक्टोबरमध्ये ४२,७७६ वाहनांची विक्री केली, गतवर्षी कंपनीने ५०,५५८ वाहनांची विक्री केली होती. कंपनीच्या स्कॉर्पिओ, एक्सयूव्ही ५००, झायलो, बोलेरो या गाड्यांच्या विक्रीत १६ टक्के घट आली आहे.
ह्युंदाईच्या विक्रीत ११.५४ टक्के वाढ
ह्युंदाईला सणाचा हंगाम चांगला गेला आहे. कंपनीच्या कार विक्रीत ११.५४ टक्क्यांनी वाढ झाली. यंदाच्या ऑक्टोबरमध्ये कंपनीच्या ५६,०१० कारची विक्री झाली. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ५०,२१२ कारची विक्री झाली होती. कंपनीच्या निर्यातीतही २६.६७ टक्के वाढ दिसून आली.