आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकिया हँडसेटचे कनेक्शन आता मायक्रोसॉफ्टच्या हाती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मोबाइल बाजारपेठेवर गेल्या चौदा वर्षांपासून वरचष्मा असतानाही नोकियाला सॅमसंग आणि अँपल या दोन्ही कंपन्यांकडून जबर आव्हान मिळाले. परिणामी कंपनीच्या मोबाइल विक्रीतही घट झाली. या सगळ्या पार्श्वभूमीवर काही दिवस अगोदरच यापुढे भारतीय बाजारपेठेत मोबाइल विक्री करणार नाही, अशी घोषणा कंपनीला करावी लागली होती.

नोकिया आणि मायक्रोसॉफ्टमध्ये झालेल्या व्यवहारानुसार नोकियाचा मोबाइल उपकरण आणि सेवा व्यवसाय संपूर्ण खरेदी करण्यासाठी 3.79 अब्ज युरो एवढी रक्कम मोजणार आहे. त्याचप्रमाणे नोकियाचे पेटंट मिळवण्यासाठी 1.65 अब्ज युरो देण्यात येणार आहेत. अशा प्रकारे एकूण 5.44 अब्ज युरो रक्कम रोख स्वरूपात देण्यात येणार असल्याचे मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे.

नोकियाला फायदा : कंपनी आणि तसेच भविष्यातील वाटचालीच्या दृष्टीने हा व्यवहार म्हणजे एक धाडसी पाऊल असून कर्मचारी, भागधारक तसेच दोन्ही कंपन्यांच्या ग्राहकांसाठी तो लाभदायक ठरणार आहे. त्याचबरोबर हार्डवेअर डिझाइन, अभियांत्रिकी, हार्डवेअर विक्री, विपणन पुरवठा साखळी, उत्पादन व्यवस्थापन यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये नोकियाचा वरचष्मा आहे. या व्यवहारामुळे मायक्रोसॉफ्टची समभाग किंमत, मोबाइल फोन बाजारातील नफा यात वाढ होणार आहे.


ल्युमियाने जुळल्या तारा
या व्यवहाराची रक्कम देण्यासाठी मायक्रोसॉफ्ट विदेशी रोख स्रोताचा वापर करणार आहे. नोकियाचे भागधारक, नियामक मंजुर्‍या आदी औपचारिकता मात्र अद्याप बाकी असल्याचे मायक्रोसॉफ्टच्या निवेदनात म्हटले आहे. नोकिया आणि मायक्रोसॉफ्टचे व्यावसायिक संबंध जुळण्यास खरे निमित्त ठरले ते नोकिया ल्युमिया नव्या मोबाइलमुळे. याते विंडोजचे सॉफ्टवेअर वापरण्यासाठी जुलै 2011 मध्ये मायक्रोसॉफ्टला भागीदार बनवले होते.


खांदेपालट होणार
नोकिया कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष म्हणून स्टीफन एलॉप बाजूला होतील. संचालक मंडळाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याकडे उपकरण आणि सेवा विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष ही नवीन जबाबदारी सोपवली जाईल. एलॉप यांच्याबरोबरच जो हालरे (कार्यकारी उपाध्यक्ष, स्मार्ट उपकरणे), जुहा पुत्कीरंता (कार्यकारी उपाध्यक्ष, कामकाज), टिमो तोईकानेन (कार्यकारी उपाध्यक्ष, मोबाइल फोन), ख्रिस वेबर (कार्यकारी उपाध्यक्ष, विक्री आणि विपणन) हे सर्व अधिकारी मायक्रोसॉफ्टमध्ये रुजू होण्याची शक्यता आहे. हंगामी काळात टिमो लामुओतिला हे नोकियाच्या अध्यक्षपदी विराजमान होतानाच मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून आपली जबाबदारी कायम ठेवतील. कंपनीचे हंगामी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रिस्तो सिलासामा हे नोकिया संचालक मंडळाचे अध्यक्ष असतील.