आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Non Seasonal Grapes Not Sweet Due To Inflation, Price Per Kg 120 Rupess

बिगरमोसमी द्राक्षे महागाईमुळे आंबटच, किंमत 120 रु प्रति किलो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नाशिक, बार्शी व सोलापूर येथील 2 क्विंटल द्राक्षे विक्रीसाठी औरंगाबाद तसेच इतर ठिकाणच्या बाजारात दाखल झाली आहेत. सध्या आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने किरकोळ बाजारात द्राक्षांना 100 ते 120 रुपये किलो भाव मिळत आहे. तर बाजार समितीत 4 हजार रुपये क्विंटल भाव मिळाला. गतवर्षीपेक्षा चांगला भाव मिळत असल्याने शेतक-यांना फायदा होत आहे. ग्राहकांना मात्र द्राक्षांची चव चाखण्यासाठी महागाईची झळ सोसावी लागत आहे.
जानेवारीत दाखल होणारी द्राक्षे यंदा हवामानातील बदलामुळे डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात दाखल झाली आहेत. त्यामुळे बाजारात पिवळसर द्राक्षांना शंभर रुपये, काळ्या द्राक्षांना 120 रुपये किलो भाव मिळत आहे. जानेवारी ते मे हा द्राक्षांचा खरा हंगाम. सध्या तरी महिनाभर भाव तेजीत राहून आवक वाढल्यानंतर भावात 30 ते 40 रुपये घटीचा अंदाज द्राक्ष विक्रेते नितीन सोनवणे यांनी व्यक्त केला आहे.
भाव वाढतील
प्रत, चव, रंग यावरून 3 ते 4 हजार रुपये प्रतिक्विंटल असा भाव द्राक्षांना मिळाला. चांगल्या प्रतीच्या द्राक्षांना यापेक्षा जास्त भाव मिळू शकतो. नानासाहेब अधाने, सचिव, जिकृउबा समिती, औरंगाबाद
परकीय चलनासाठी द्राक्षांचा मोठा वाटा
द्राक्ष फळास स्थानिक तसेच आंतरराष्‍ट्रीय बाजारपेठ उपलब्ध आहे. याचबरोबर द्राक्षांपासून मनुके, वाइन, शिरका व इतर पदार्थ तयार केले जातात. औषध निर्मितीसाठी द्राक्षे उपयोगी आहेत. त्यामुळे द्राक्षांना मोठी मागणी आहे. त्यामुळे नाशिक, सोलापूर, उस्मानाबाद, सांगली, पुणे जिल्ह्यातील शेतक-यांनी द्राक्ष उत्पादनात लक्षणीय वाढ केली आहे. परकीय चलन मिळवण्यातही द्राक्षांचा वाटा मोठा आहे.
डाळिंब, केळी, अंजीर, सफरचंद महागच
गणेश डाळिंब 120 रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहे. गतवर्षीच्या दुष्काळामुळे केळी उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे केळी 30 ते 40 रुपये डझनला भाव मिळत आहे. अंजीर 70 ते 80 व सफरचंदाचे भाव शंभर ते 120 रुपयांवर पोहोचले आहेत. सर्वसामान्यांच्या आवक्याबाहेर या किमती गेल्या आहेत.