आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Now Do Share Market Business Through Social Networking

आता सोशल नेटवर्किंगवरून करा शेअर बाजाराचे व्यवहार!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - एकमेकांशी संपर्कात राहणे, माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी तरुणाईचे सोशल मीडियावरचे वाढलेले प्रेम लक्षात घेऊन आता कंपन्यादेखील या माध्यमाला जवळ करू लागल्या आहेत. त्यामुळेच जास्तीत जास्त तरुण वर्गाला भांडवल बाजाराकडे आकृष्ट करण्यासाठी ‘जिओजित बीएनपी पॅरिबा’ने थेट खास ‘फेसबुक’साठीच ‘फ्लिप सोशल’ हे पहिलेवहिले ‘स्टॉक ट्रेडिंग’ अ‍ॅप दाखल केले आहे.


या फ्लिप सोशलमुळे फेसबुककरांना आता मुंबई शेअर बाजारात व्यवहार करता येईल, पण त्याच वेळी आपल्या पेजवरून दूर न जाता मित्रांच्या संपर्कात राहता येणार आहे.


मुंबई शेअर बाजार स्वत: आपल्या स्वत:च्या संकेतस्थळासाठी सोशल वेबसाइटचा वापर करते. त्यामुळे नव्या गुंतवणूकदारांमध्ये भांडवल बाजाराबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल आहे. जास्तीत जास्त गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचल्यामुळे भांडवलनिर्मितीही चांगल्या प्रकारे होण्यास मदत होऊ शकेल, असे मत मुंबई शेअर बाजाराचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य अधिकारी आशिष चौहान यांनी सांगितले. मुंबई शेअर बाजाराच्या सभागृहात या नव्या अ‍ॅपचे अनावरण करताना ते बोलत होते. या वेळी जिओजित बीएनपी पॅरिबाचे अध्यक्ष ए.पी. कुरियन आणि जिओजित टेक्नॉलॉजीज लि.चे व्यवस्थापकीय संचालक ए. बालकृष्णन उपस्थित होते.
जिओजित टेक्नॉलॉजीजचे ए . बालकृष्णन म्हणाले की, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदार हा एक नवा गुंतवणुकदारांचा वर्ग असून तो सध्या विखुरला गेला आहे. परंतु या माध्यमातून पात्र संस्थात्मक गुंतवणुकदार भांडवल बाजाराशी जोडले जाऊ शकतात. जिओजितच्या फेसबुक पेजला 1,00,000 पेक्षा जास्त लाइक्स मिळाले असून त्यामध्ये 18 ते 24 वयोगाटाचे प्रमाण 66 टक्के आहे. त्यामुळे कंपनीने हे अ‍ॅप विकसित करण्याचा निर्णय घेतला. या अ‍ॅपचे अनावरण झाल्यानंतर पहिल्या एका तासातच 200 पोस्ट आल्या असून नजीकच्या काळात या पोस्टचे गुंतवणूकदारांमध्ये रूपांतर होईल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.


या अनोख्या अ‍ॅपची वैशिष्ट्ये अशी
० गुंतवणूक प्रशिक्षण वर्गाचे व्हिडिओत रूपांतर. त्यामुळे फेसबुकवरच गिरवता येणार गुंतवणुकीचे धडे.
० बाजाराशी निगडित खेळाबरोबरच शिक्षण
० वापरकर्त्यांना अ‍ॅक्सेस क्रेडेन्शियल वापरून ‘बीएसई’त व्यवहार शक्य.
० शेअर बाजार आणि ट्रेडिंग अ‍ॅप्लिकेशनमध्ये व्यवहार केल्याचा व्हर्च्युअल आनंद
० अर्थशास्त्र या फेसबुक ट्रेडिंग खेळात आठवड्याच्या शेवटच्या दिवशी त्या आठवड्यात सर्वाधिक नफा मिळवलेल्यांसाठी बीएसईतर्फे बक्षीस


युजर्सना काय करावे लागेल?
० बाजारात प्रत्यक्ष व्यवहारासाठी इ-मेल देऊन केवायसी नियमांची पूर्तता.
०फेसबुक अ‍ॅपवरील खेळ युजर्ससाठी बंधनकारक नव्हे तर खुला पर्याय असेल.