आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय शेअर बाजारात ‘गोल्ड ईटीएफ’ला सुवर्ण झळाळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पिवळ्या मौल्यवान धातूच्या पडलेल्या किमतींचा फायदा उचलत अक्षय्य तृतीयेला ग्राहकांनी सोन्याची दणकून खरेदी केली आहे. परिणामी सोने खरेदीसाठी पवित्र मानल्या जाणार्‍या या दिवशी ग्राहकांनी राष्ट्रीय शेअर बाजारात 691 कोटी रुपयांचे गोल्ड ईटीएफचे व्यवहार केले. मागील वर्षातल्या 608 कोटी रुपयांच्या व्यवहाराच्या तुलनेत यंदा त्यात तब्बल 14 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

जानेवारी ते मार्च या कालावधीत सोन्याच्या किमतीत 4.7 टक्क्यांनी घसरण झाली आणि त्यानंतर एप्रिल महिन्यात त्यात आणखी 7.5 टक्क्यांनी घसरण झाली. अक्षय्य तृतीया अगदी जवळ आलेली असतानाच सोन्याच्या किमती पडल्याने खरेदीदारांनी गुंतवणुकीची ही संधी वाया जाऊ दिली नाही.

किरकोळ गुंतवणुकदार अशा प्रकारच्या गुंतवणुकीत जास्त स्वारस्य दाखवत असल्याने गेल्या सलग चार वर्षांपासून गोल्ड ईटीएफमधील उलाढाल लक्षणीय वाढली आहे. मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिलच्या मध्यास इटीएफमधील व्यवहारांचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे.

राष्ट्रीय शेअर बाजारात यंदाच्या मार्च महिन्यात 284 कोटी रुपयांचे व्यवहार गोल्ड ईटीएफमध्ये झाले; पण एप्रिल महिन्यात या व्यवहारांचे प्रमाण 3.2 पटीने वाढून ते 926 कोटी रुपयांवर गेले असल्याचे राष्ट्रीय शेअर बाजाराने म्हटले आहे.यंदाच्या ऑक्टोबर ते मार्च या गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत राष्ट्रीय शेअर बाजारात सरासरी 328 कोटी रुपयांची मासिक उलाढाल झाली. परंतु गोल्ड ईटीएफमधील उलाढाल 1.5 पटीने वाढून ती 510 कोटी रुपयांवर गेली आहे.

प्रत्यक्ष सोने खरेदीपेक्षा गुंतवणूक करण्याचे एक सुरक्षित साधन म्हणून गोल्ड ईटीएफकडे लोकांचा कल वाढत आहे. त्यामुळे गोल्ड ईटीएफच्या व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता जवळपास 18 टक्क्यांनी वाढून ती अगोदरच्या वर्षातल्या मार्च महिन्यातील 9886 कोटी रुपयांवरून यंदाच्या मार्चमध्ये 11,648 कोटी रुपयांवर गेली. दरम्यान आरबीआयने मंगळवारी बँकांना सोन्याची आयात करण्यावर बंदी लादली आहे.

‘युनिट्स’ची संख्या वाढली
गोल्ड ईटीएफमधील ‘युनिट्स’ची संख्या 14 टक्क्यांपेक्षा जास्त वाढून ती गतवर्षीच्या 23,60,000 युनिट्सवरून 26,98,610वर गेली आहे. निफ्टीने अक्षय्य तृतीयेसाठी गोल्ड ईटीएफ व्यवहारांसाठी यंदा संध्याकाळी सात वाजेपर्यंत वेळ वाढवली होती. त्यामुळे गुंतवणुकदारांना गोल्ड ईटीएफमध्ये व्यवहाराची जास्त संधी मिळाली.