आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Number Of Mutual Fund Accounts Decline In 2012 13

म्युच्युअल फंडांतून एक्झिटचे प्रमाण वाढले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - शेअर बाजारातील तेजीचा फायदा घेत गुंतवणूकदारांनी नफा वसुलीचा धडाका लावला आहे. यामुळे चालू आर्थिक वर्षात म्युच्युअल फंडाला जबर फटका बसला आहे. नफा वसुली करत वैयक्तिक गुंतवणूकदारांनी फंडातून एक्झिट घेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे फंडांच्या फोलिओ (फंडाचे वैयक्तिक खाते ) संख्येत घट आली आहे.

भांडवल बाजार नियंत्रक व नियामक सेबीने जारी केलेल्या देशातील 44 म्युच्युअल फंड हाउसमधील गुंतवणुकीबाबतच्या आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षात देशातील एकूण फंड खात्यांची संख्या 4.32 कोटींपर्यंत घसरली आहे. गेल्या आर्थिक वर्षात (2011-12) फोलिओची संख्या 4.64 कोटी होती. अशा प्रकारे 2012-13 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या 10 महिन्यांत देशातील म्युच्युअल फंड फोलिओंची संख्या 32.45 लाखांनी घटली आहे.

फोलिओच्या संख्यातील घटीचा सर्वाधिक फटका इक्विटी म्युच्युअल फंड योजनांना बसला आहे. यातील गुंतवणूकदारांची
संख्या म्हणजेच फोलिओ 40.2 लाखाने घटली आहे. मार्च 2012 मध्ये इक्विटी फंड फोलिओची संख्या 3.76 कोटी होती, ती जानेवारी 2013 मध्ये घटून 3.36 कोटी झाली.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांत म्युच्युअल फंडातील फोलिओ बंद करण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. त्याबरोबरच इक्विटी फंड योजनेतून बाहेर पडणार्‍यांची संख्या वाढली आहे. जानेवारी 2013 मध्ये इक्विटी फंड योजनेतून 2,501 कोटी रुपये काढण्यात आले. 2012-13 मधील एप्रिल ते जानेवारी या काळात मुंबई शेअर बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकात 14 टक्के वाढ दिसून आली. या तेजीचा लाभ घेत काही गुंतवणूकदारांनी नफा वसुलीवर लक्ष केंद्रित केल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

प्रमुख कारण
क्वांटम मॅनेजमेंट कंपनीचे सीईओ जिमी पटेल यांच्या मते, नफा वसुलीमुळे गुंतवणूकदार फंडातून बाहेर पडत आहेत.तसेच म्युच्युअल फंड क्षेत्रात विविध योजनांच्या विलीनीकरणामुळेही फोलिओंची संख्या कमी होत आहे.