आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Oil Company Makes Benefit From Diseal, Divya Marathi

डिझेल स्वस्ताईकडे, लिटरमागे कंपन्यांना १.९० रुपये नफा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने देशातील डिझेलच्या विक्रीत तेल विपणन कंपन्यांना लिटरमागे १.९० रुपयांचा नफा होत आहे. हा लाभ ग्राहकांना मिळवून देण्यासाठी तेल मंत्रालय आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेहून परतण्याची प्रतीक्षा करत आहे. मोदी परतल्यानंतरच डिझेलच्या किमती कमी करण्याबाबतचा निर्णय होईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतीत गेल्या काही महिन्यांपासून घसरण सुरू आहे. सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात देशातील तेल विपणन कंपन्यांना लिटरमागे ३५ पैशांचा नफा होत होता. तेल मंत्रालयाने मात्र थांबा आणि वाट पाहा असे धोरण अवलंबले. सप्टेंबरच्या अखेरीस हा नफा वाढून लिटरमागे १.९० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. या नफ्याचा लाभ ग्राहकांना मिळावा यासाठी तेल मंत्रालय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेवरून परतण्याची वाट पाहत आहे. तेलमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यापूर्वीच पंतप्रधान मोदी यांना या बदलत्या परिस्थितीची माहिती पत्राद्वारे कळवली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

कपातीचे घोडे का अडले ?
डिझेलच्या किमतीवर सरकारचे नियंत्रण आहे. जानेवारी २०१३ मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार डिझेल विक्रीतील तोटा भरून काढण्यासाठी महिन्याकाठी लिटरमागे ४० ते ५० पैसे वाढ करण्यात येते. सध्याही हेच सूत्र सुरू आहे. त्यामुळे तेल कंपन्यांना डिझेलच्या किमतीत वाढ किंवा कपात करता येत नाही. त्यासाठी सरकारची परवानगी लागते. पंतप्रधान मोदी हे अमेरिकेच्या दौ-यावर असल्याने सरकारकडून निर्णय येत नसल्याने डिझेल कपातीचे घोडे अडले आहे.

रॉकेल, गॅसचा तोटा घटला
सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठीचे अर्थात रेशनवरील रॉकेल तसेच घरगुती गॅसच्या विक्रीवरील तोटाही घटला आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात रॉकेलवर लिटरमागे ३१.२२ रुपये, तर सिलिंडरमागे ४०४.६४ रुपये तोटा होत आहे. मागील पंधरवड्यापेक्षा हा तोटा घटला आहे. आयओसी, बीपीसीएल आणि एचपीसीएल या कंपन्यांना रॉकेल व घरगुती गॅसच्या विक्रीत दररोज १५६ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागतो. मागील पंधरवड्यात हाच तोटा दिवसाकाठी १९० कोटी रुपये होता.