Home | Business | Gadget | oil prices down, market have chance to move ahead, business, national

बाजारावर दबाव राहणार

बिझनेस ब्युरो | Update - Jun 26, 2011, 04:33 AM IST

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे जागतिक स्तरावरील बहुतांश बाजारांत उत्साह दिसून आला.

 • oil prices down, market have chance to move ahead, business, national

  नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे जागतिक स्तरावरील बहुतांश बाजारांत उत्साह दिसून आला. वाढती महागाई तसेच व्याजदरातील वाढीची चिंता काहीअंशी कमी झाल्याने भारतीय गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केल्याने आठवड्याच्या शेवटच्या सत्रात सेन्सेक्सने ५१३ अंकांची उसळी घेतली. नऊ महिन्यांनंतर बाजारात असे उत्साही वातावरण दिसले. मात्र शुक्रवारी रात्री झालेल्या इंधन दरवाढीमुळे सोमवारच्या सत्रात बाजाराचा मूड कसा राहतो, यावर आगामी काळातील वाटचाल अवलंबून राहणार आहे.
  वाढते व्याज दर आणि महागाईचा दबाब भारतीय बाजारावर आठवड्याच्या सुरुवातीला होता. गुरुवारी बाजारात जोरदार खरेदी झाली. त्यामुळे सेन्सेक्स १७७ अंकांनी वर गेला. शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या तसेच ग्रीकच्या आर्थिक पेचाबाबत युरोपियन युनियनने सकारात्मक संकेत दिले. यामुळे आशियातील तसेच युरोपातील बाजारात उत्साह दिसून आला. याचा परिणाम भारतीय बाजारावर झाला.
  खरेदीदारांनी हात आखडता न घेता खरेदीचा सपाटा लावला. परिणामी सेन्सेक्स २.८९ टक्क्यांच्या वाढीसह १८२४०.६८ अंकांवर बंद झाला. या खरेदीमध्ये अनेक दिग्गज कंपन्यांचे समभाग वधारले. विशेषत: तेल कंपन्यांच्या समभागांना या तेजीचा चांगला फायदा झाला. शुक्रवारी झालेली खरेदी एवढी जोरदार होती की, सेन्सेक्सने १८ हजारांचा टप्पा लिलया पार केला. गेल्या नऊ दिवसांपासून सेन्सेक्स १८ हजारांच्या खाली होता. एवढेच नव्हे तर सेन्सेक्सने शुक्रवारी एका दिवसात ५१३.१९ अंकांची झेप घेतली. १ मार्च २०११ पासूनची एका दिवसातील ही सर्वाधिक वाढ आहे.
  १ मार्चला सेन्सेक्सने ६१३ अंकांची वाढ दिसून आली होती. विशेष म्हणजे गेल्या तीन आठवड्यांत प्रथमच सेन्सेक्सने साप्ताहिक वाढ दर्शवली.
  आयआयएफएल रिसर्चचे प्रमुख अमर अंबानी यांनी सांगितले की, जगभरातील बाजारातील तेजी तसेच कच्च्या तेलाच्या उतरलेल्या किमती, खरेदीदारांनी केलेली शॉर्ट-कव्हरिंग यांमुळे तेजी दिसून आली. आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीद्वारे ६ कोटी बॅरल कच्चे तेल बाजारात आल्याने याबाबत असणारी चिंता दूर झाली आहे.

  कच्च्या तेलातील घसरणीमुळे बाजाराला दिलासा
  जोरदार खरेदीमुळे बाजारात उत्साह
  वाढते व्याजदर व महागाईचा प्रभाव राहणार

  सर्वाधिक बाजारमूल्यात ‘टीसीएस’, ‘एसबीआय’ टॉप
  ‘सेन्सेक्स’च्या यादीत असलेल्या कंपन्यांमध्ये बाजारमूल्याच्या बाबतीत सर्वाधिक कमाई करण्यामध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक आॅफ इंडिया ‘टॉप’ ठरल्या. या दोघांच्या बाजारमूल्यात प्रत्येकी ८ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. टाटा मोटर्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा, जिंदाल स्टील, हिंदाल्को, बजाज आॅटो, डीएलएफ या कंपन्यांच्या बाजारमूल्यात प्रत्येकी १ हजार कोटी रुपयांनी वाढ झाली आहे; परंतु त्या तुलनेत टाटा पॉवर, सिप्ला, मारुती सुझुकी, जयप्रकाश असोसिएट्स आणि रिलायन्स कम्युनिकेशन्स यांच्या बाजारमूल्यात मात्र फारशी वाढ झाली नाही.

Trending