आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Old Note Of 2005 Can Get Change In Banks, Reserve Bank Decision

बँकांमध्ये 2005 पूर्वीच्या जुन्या नोटा बदलून मिळणार, रिझर्व्ह बँकेचा निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - काळा पैसा व बनावट नोटांना आळा घालण्याच्या उद्देशाने भारतीय रिझर्व्ह बँकेने सन 2005 पूर्वी जारी झालेल्या सर्व चलनी नोटा परत मागवण्याचा निर्णय घेतला आहे. 1 एप्रिल 2014 पासून 500 व 1000 रुपयांसह सर्व नोटा परत घेण्याचे काम सुरू होईल. याबाबतचे आदेश बुधवारी जारी करण्यात आले.
रिझर्व्ह बँकेच्या पत्रकानुसार, 2005 पूर्वी जारी झालेल्या सर्व नोटा चलनातून परत घेण्याची प्रक्रिया 31 मार्चनंतर सुरू होईल. म्हणजेच 1 एप्रिलपासून नागरिकांना नोटा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये जावे लागेल. मात्र 2005 पूर्वी जारी झालेल्या सर्व नोटा चलनात वैधच राहतील. म्हणजेच नागरिकांकडे नऊ वर्षांपूूर्वीपेक्षा अधिक जुन्या नोटा असतील तर त्या व्यवहारांसाठी पूर्वीसारख्याच मान्य असतील.
बँकांनी मदत करावी : लोकांनी घाबरून न जाता सहकार्य करावे, असे आवाहन आरबीआयने केले आहे. 1 एप्रिलनंतर सर्व जुन्या नोटा वैध राहतील. त्या कोणत्याही बँकेतून बदलून घेता येतील.
सुरक्षा मानकांमुळे निर्णय :
आरबीआयच्या प्रवक्त्या अल्पना किलावाला म्हणाल्या, 2005 पूर्वीच्या 500 व 1000 रुपयांच्या नोटांत अनेक सुरक्षाविषयक मानके नव्हती. यामुळे अस्सलतेची पडताळणी करणा-या यंत्रात त्यांच्या मानकांची तपासणी होऊ शकत नाही. यामुळे सुरक्षा मानके नसलेल्या नोटा आऊटडेटेड श्रेणीत गणल्या जातात. 2012-13 मध्ये 14.1 अब्ज नोटा चलनातून बाहेर करण्यात आल्या आहेत.
असा ओळखावा जुन्या आणि नव्या नोटांतील महत्त्वाचा फरक
सन 2005 पूर्वीच्या नोटांच्या पाठीमागे बरोबर मध्यभागी तळास नोटा जारी करण्याचे वर्ष छापलेले नाही. या नोटा परत घेतल्या जातील.
2005 नंतर जारी झालेल्या सर्व नोटांवर त्याच्या छपाईचे वर्ष छापलेले आहे. यामुळे त्या बदलून घेण्याची गरज नाही.
1 जुलैनंतर ओळखपत्र सक्तीचे
भारतीय रिझर्व्ह बँकेनुसार, 30 जूनपर्यंत कुणीही कितीही नोटा बँकेतून बदलून घेऊ शकेल. मात्र 1 जुलैनंतर हा नियम कठोर होईल. यानंतर 500 आणि हजारांच्या 10 पेक्षा अधिक नोटा बदलण्यासाठी बँकेत ओळखपत्र व पत्त्याचा पुराव्याची प्रत सादर करावी लागेल.