आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नगरमध्ये कांद्याचे भाव भिडले गगनाला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - गेल्या दोन महिन्यांपासून आवक मंदावल्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव दिवसेंदिवस नवे उच्चांक गाठत आहेत. राहाता बाजार समितीत रविवारी कांद्याला 6 हजार रुपये प्रतिक्विंटल असा उच्चांकी भाव मिळाला, सरासरी साडेपाच हजार रुपयांचा भाव मिळाला, तर किरकोळ बाजारात गेल्या आठ दिवसांत कांद्याच्या दरांमध्ये प्रतिकिलो 20 ते 25 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे कांद्याने नगरकरांना रडवायला सुरुवात केली आहे.

एप्रिल ते जून या कालावधीत साठवणूकदार कांद्याची खरेदी करतात. ते भाव व सध्याचे भाव लक्षात घेतले तर सध्या उत्पादकांचा फायदा निश्चित असल्याचे जाणवत आहे; पण सध्या त्यांच्याकडे कांदा कमी आहे. तीन वर्षांपूर्वी डिसेंबर महिन्यात कांद्याचे भाव 70 ते 80 रुपये प्रतिकिलोपर्यंत गेले होते. सध्या बाजारात भारी कांदा 55, तर हलका कांदा 30 रुपये प्रतिकिलो विकला जात आहे.

नेवासे तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव उपआवारात सोमवारी 24 हजार 671 कांदा गोण्यांची आवक झाली. एक नंबर कांद्याला 4 हजार 500 ते 5 हजार 200 रुपये, दोन नंबर कांद्याला 3 हजार 700 ते 4 हजार 500 रुपये, तीन नंबर कांद्याला 2 हजार ते 2 हजार 900 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 3 हजार 500 ते 4 हजार 500 व जोडकांद्याला 2 हजार ते 2 हजार 500 रुपये भाव मिळाला. घोडेगावात यंदा मिळालेला हा सर्वाधिक भाव असल्याचे बाजार समितीचे सभापती वसंत रोटे यांनी सांगितले.

संगमनेर बाजार समितीत रविवारी कांद्याला प्रतिक्विंटल साडेसहा हजार रुपये, असा भाव मिळाला. बाजार समितीमध्ये 1,450 क्विंटल कांद्याची आवक झाली. लिलावात कमीत कमी 3 हजार व जास्तीत जास्त साडेसहा हजार रुपये व सरासरी 4,200 रुपये भाव मिळाला. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पण, बाजारात प्रतिकिलोचे भाव 55 रुपयांपर्यंत गेल्यामुळे सामान्य ग्राहकाच्या डोळ्यात पाणी यायला सुरुवात झाली आहे.

चांगल्या भावासाठी उत्पादक रस्त्यावर
कांद्याचे भाव तेजीत असले तरी लिलावात सर्वाधिक निघालेला भाव ठरावीक कांदा गोण्यांनाच मिळतो. इतर गोण्यांना सुमारे 200 रुपये कमी भाव मिळतो. त्यामुळे गेल्या आठवड्यात दोन वेळा कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर आले. व्यापार्‍यांकडून लिलावात फसवणूक होत असल्याचा आरोप करीत रविवारी राहुरीमध्ये, तर सोमवारी दुपारी घोडेगावमध्ये शेतकर्‍यांनी रास्ता रोको आंदोलन केले. राहुरीत आंदोलन केल्यामुळे शेतकर्‍यांना नंतर चांगला भाव मिळाला. परंतु, घोडेगावमध्ये आंदोलन करूनही भाव स्थिर होते.