नाशिक - पाऊस सुरू झाल्याने साठवण केलेल्या कांद्याची बाजार समितीमध्ये आवक वाढल्याने आणि मागणी घटल्याने दरात आठशे ते नऊशे रुपये दराने क्विंटलमागे घसरण झाली आहे. तसेच दक्षिण भारतातील कांदाही बाजारात येत असल्याने दरात अजून दोनशे ते चारशे रुपयांची घसरण होण्याची शक्यता व्यापार्यांनी व्यक्त केली आहे.
पाऊस सुमारे दीड महिना उशिरा सुरू झाल्याने बहुतांश कांदा उत्पादक कांदा विक्रीऐवजी साठवण करून दर वाढीच्या प्रतीक्षेत होते. मात्र 16 जुलैपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली.वातावरण बदलले. परिणामी कांदा खराब होण्यास सुरुवात झाल्याने उत्पादकांनी कांदा विक्रीस सुरुवात केली.
बाजार समित्यात कांद्याची आवक वाढली, त्यातच दक्षिणेतूनही कांदा विक्रीला येत आहे. त्यामुळे देशभरात जाणार्या नाशिकच्या कांद्याची मागणी घटली त्यामुळे भाव घसरत आहेत. सध्याचे वातावरण दमट व आर्द्रतायुक्त आहे.त्यात कांदा लवकर खराब होत आहे. त्यामुळे व्यापारीही कांदा खरेदीकडे दुर्लक्ष करीत असल्याने भाव घसरत आहे. कांदा दरात वाढ झाल्याने केंद्राने निर्यातमूल्य 500 डॉलर प्रतिटन केल्याने निर्यातीवर परिणाम झाल्याने हजारो टन कांदा देशातच विक्री होत आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा अधिक असल्याने दरावर परिणाम झाला. ग्राहकांना 22 ते 25 रुपये किलोने कांदा उपलब्ध होऊ लागला. कांदा खराब होत असल्याने शेतकर्यांनी विक्रीसाठी गर्दी केली आहे.