आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन बँकिंग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑनलाइन बँकिंग लाभदायक आहे व ते आता आगामी काळात करावेच लागणार आहे. संगणकीकरण, कोअर बॅँकिंग
यामुळे खातेदारांना, ग्राहकांना नेमक्या वेळेत सेवा देण्यास बॅँका तत्परतेने कटिबद्ध झाल्या आहेत. देशाच्या कानाकोपर्‍यात पोहोचलेले एटीएम, जवळजवळ सर्व बॅँकांच्या सर्व शाखांच्या खातेदारांना रोख रकमा उपलब्ध करून देत आहेत. ऑनलाइन बॅँकिंग ही यापुढील पायरी आहे. कित्येक शहरांत लोक आज याचा सर्रास वापर करीत आहेत. मोबाइल किंवा इंटरनेटद्वारे, ई-मेलद्वारे ऑनलाइन बॅँकिंग करून आर्थिक व्यवहार करीत आहेत. या ऑनलाइन बँकिंगमध्ये अनेक फायदे आहेत. प्रवास, वेळ, खर्च यांची बचत मोठ्या प्रमाणात होतेच, आर्थिक व्यवहारांना गती येतेच, शिवाय पटकन निर्णय, चटकन ई-संवाद कार्यवाहीतून व्यवसायवृद्धी व लाभही वाढतात. दिरंगाईतून उद्भवणारे तोटे संपून जातात. जास्तीत जास्त खातेदार, ग्राहक ‘ऑनलाइन बॅँकिंग’ करायला लागले आहेत.

45 मिनिटांत एक कोटी लंपास
वाढत्या ‘ऑनलाइन बॅँकिंग’च्या आरंभीच्या काळातच यातून अकस्मात, अचानक अंगावर येणारे धोके, तोटे व नुकसान गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात उघड झाले आहे. अवघ्या 45 मिनिटांत एक कोटी रुपये लंपास केल्याची बातमी ताजी आहे. त्यानंतर पुन्हा एका खात्यातून थोड्या काळात लाखो रुपये लांबवल्याचीही बातमी आली. या ई-मेल बॅँकिंगमध्ये, मोबाइल बॅँकिंगमध्ये, डेबिट-क्रेडिट कार्डाच्या व्यवहारात, अनेकांना पाहता पाहता गंडा घातला जातो व याच्या बातम्या येत असतात. यामुळे एकूणच ‘ऑनलाइन बॅँकिंग’मध्ये धोका असल्याची धास्ती घेतली जाते. प्रत्यक्षात मात्र हातोहात चोरीचे धोके हे सर्व आर्थिक व्यवहारात असतात, तेवढे ते येथेही आहेत. पण येथे जर आपण संपूर्ण संगणक सॉफ्टवेअर तंत्रज्ञान साक्षर नसलो व आवश्यक ती सावधानता पाळली नाही तर तंत्रकुशल सायबर गुन्हेगार मंडळी आपल्याला कळेपर्यंत आपली कष्टार्जित कमाई लांबवण्याचे धोके जास्त.

ऑनलाइन बॅँकिंग सुरक्षित करण्यासाठी काही गोष्टी करताना कायम सावधानता बाळगली पाहिजे. सायबर गुन्हेगार मंडळी हुशार तंत्रज्ञ पण लबाड असतात. बॅँक खाते ‘हॅक’ करण्यासाठी, ई-मेलने बॅँकेच्या बनावट वेबसाइट दाखवून माहिती मागवली जाते. खर्‍या बॅँकेकडून हा मेल आला आहे याची खात्री न करता खातेदाराने माहिती कळवली की तिचा उपयोग करून खात्यावरच्या रकमा काढल्या जातात. म्हणून ई-मेलने कुठलीही माहिती मागितली तरी ती देऊ नये. त्याऐवजी बॅँकेकडे विचारणा करावी. तसेच कित्येक वेळा आपण अनवधानाने किंवा बेजबाबदारपणे पासवर्ड किंवा पिनकोड, सुरक्षितपणे गुप्त ठेवत नाही. तो उचलला गेला की चतुर शर्विलकांना संधी मिळते. कोणी कितीही जवळचा व विश्वासाचा असो, आपला पासवर्ड, पिनकोड कोणालाही देऊ नका. लिहून ठेवू नका.

पासवर्ड अधूनमधून बदलावा
आपल्या ऑनलाइन खात्यांसाठी पासवर्ड वापरताना तो सर्व ऑनलाइन खात्यासाठी एकच वापरावा तसेच युनिक रजिस्ट्रेशन क्रमांक, वनटाइम पासवर्ड व ऑनलाइन झिपॅँग पासवर्ड कोणालाही सांगू नयेत. अपरिचिताकडूनचे मेल उघडणे टाळावे. इंटरनेट बॅँकिंगचे काम झाल्यावर प्रथम लॉगआऊट व्हावे व मग वेबसाइट बंद करावी. ऑनलाइन व्यवहार झाल्यावर त्याची माहिती, कन्फर्मेशन मोबाइलवर येते ते पाहावे. मुख्य म्हणजे आपली माहिती चोरीला जाऊ नये यासाठी आपला पासवर्ड वारंवार अधूनमधून बदलावा. या सावधानता घेतल्या तरी नियमितपणे आपल्या खात्यावरचे मोठे व्यवहार आपणच केले असल्याची नियमितपणे खात्री करून घ्यावी.