आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्युच्युअल फंडांतील ऑनलाइन गुंतवणुकीचे पर्याय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्याकडे आता ऑनलाइन गुंतवणुकीत वाढ होत आहे. विविध उत्पादनात गुंतवणुकीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि त्याचा वेग वाढवण्यासाठी सर्व्हिस प्रोव्हायडर नवनवे पर्याय उपलब्ध करून देत असतात. यात ग्राहकांनाच नव्हे तर वित्तीय सल्लागारांनाही एका क्लिकवर सहजपणे गुंतवणूक करता येते. यात गुंतवणुकीसाठी लागणारा वेळ तर वाचतोच शिवाय खर्चही वाचतो. म्युच्युअल फंडासाठी ऑनलाइन गुंतवणुकीचे पर्याय असे :
वेबसाइटच्या माध्यमातून : अनेक कंपन्या आपल्या संकेतस्थळावरून गुंतवणुकीचा पर्याय देत आहेत. सध्याचे गुंतवणूकदारही एका क्लिकद्वारे गुंतवणूक करू शकतात. नव्या गुंतवणूकदारांना मात्र यासाठी नो युवर कस्टमर (केवायसी) प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. या पर्यायात एक अडचण अशी की, यात संबंधित कंपनीच्या वेबसाइटद्वारे विविध योजनांतील गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ बनवावा लागतो. काही जणांना प्रकारात आपल्या पोर्टफोलिओवर लक्ष ठेवणे अडचणीचे वाटते. मात्र, ऑनलाइन पोर्टफोलिओ ट्रॅकर्स आणि कॅम्सची कन्सॉलिडेटेड स्टेटमेंट सेवा ही अडचण ब-याच अंशी दूर करते. जेव्हा तुम्ही एसआयपीद्वारे गुंतवणूक करता तेव्हा एकदाच या प्रक्रियेतून जावे लागते. एका ठिकाणाहून गुंतवणुकीवर लक्ष ठेवणे सुलभ जाते. त्यासाठी अनेक साधने उपलब्ध आहेत. डायरेक्ट प्लॅनसाठी हा पर्याय चांगला असून ग्राहक स्वत: व्यवहार करू शकतो.


ऑनलाइन प्लॅटफॉर्म : अलीकडे गुंतवणूकदारांसाठी अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्म सादर केले आहेत. याद्वारे सर्व प्रकारच्या म्युच्युअल फंडांत गुंतवणूक करणे शक्य आहे. गुंतवणुकीवर लक्ष ठेवता येते. फंडसइंडिया डॉट कॉम, फंडससुपरमार्ट डॉट कॉम हे या क्षेत्रातील उल्लेखनीय ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहेत, तर आयसीआयसीआय डायरेक्ट, रेलिगेअरसारखे ऑनलाइन ब्रोकरेजकडूनही ऑनलाइन म्युच्युअल फंडातील खरेदी-विक्री आणि पोर्टफोलिओवर नजर ठेवण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, या ब्रोकरेजकडून डायरेक्ट गुंतवणुकीची सोय नाही. यासाठी शुल्क भरल्यास ही सुविधा मिळते. याद्वारे गुंतवणुकीसाठी ही सोय चांगली असली तरी त्यासाठीचा खर्च विचारात घ्यावा.
स्टॉक एक्स्चेंज : म्युच्युअल फंडांतील गुंतवणूक डीमॅट खात्यात ठेवणे आणि स्टॉक एक्स्चेंजच्या माध्यमातून खरेदी -विक्री करण्याच्या दृष्टीने ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. मात्र, याला गुंतवणूकदारांकडून फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. डीमॅट सांभाळणे आणि त्याचा खर्च सहन करण्यात अडचणी येतात.


म्युच्युअल फंड वितरक : लवकरच म्युच्युअल फंड सल्लागारही ऑनलाइन गुंतवणुकीच्या पर्यायाचा लाभ घेऊ शकतील. म्युच्युअल फंडातील आघाडीची संघटना एम्फी एमएफ युटिलिटी सुरू करण्याच्या तयारीत आहे. 2014 मध्ये ही सुविधा सुरू होण्याची शक्यता आहे. या माध्यमातून सर्व वितरक एकाच प्लॅटफॉर्मद्वारे खेरदी-विक्री करू शकतील. एवढेच नव्हे तर फंडसइंडिया, आयफास्ट किंवा आयसीआयसीआय डायरेक्टसुद्धा फायनान्शियल अ‍ॅडव्हायझर्ससाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देऊ शकतील. याद्वारे गुंतवणुकीचे व्यवस्थापनच नव्हे, तर गुंतवणूकदारांसाठी खरेदी-विक्री करता येणार आहे. जे फंड वितरक स्टॉकब्रोकर्स नाहीत अशांनाही ही सुविधा वापरता येणार आहे. अनेक प्लॅटफॉर्म आपल्या सेवांचा विस्तार रोखे, एफडी आणि इतर उत्पादनासाठी करत आहेत. म्युच्युअल फंडात ऑनलाइन गुंतवणूक करणे सुलभ आणि किफायतशीर आहे. लवकरच मोबाइलद्वारे गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या सर्व सोयी-सुविधांचा फायदा घ्या,मात्र त्यासाठी किती खर्च येतो हेही विचारात घ्या.


लेखक मान्यताप्राप्त गुंतवणूक मार्गदर्शक असून द फायनान्शियल प्लॅनर्स इंडियाचे सदस्य आहेत.