आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन गुंतवणुकीसाठी भारतीयांना हवी दुस-यांची मदत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - इंटरनेट साक्षरतेचे प्रमाण वाढूनदेखील बहुतांश भारतीय इंटरनेटच्या माध्यमातून गुंतवणुकीचा निर्णय घेताना आजही दुसºया व्यक्तींवर जास्त अवलंबून राहत असल्याचे ‘नेल्सन’ या कंपनीने केलेल्या एका सर्वेक्षणामध्ये दिसून आले आहे.
इंटरनेटमुळे अनेक आर्थिक व्यवहार, गुंतवणुकीचे मार्ग सुलभ झाले आहेत. त्यामुळे म्युच्युअल फंड, धातू, समभाग किंवा रोखे या आपल्या पसंतीच्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करताना पाचपैकी दोन ऑनलाइन भारतीय ग्राहक स्वत:चे निर्णय घेतात. हे प्रमाण 41 टक्के असल्याचे नेल्सनच्या ‘गुंतवणुकीचा दृष्टिकोन’ या सर्वेक्षणात म्हटले आहे.
पर्सनल फायनान्स किंवा गुंतवणुकीच्या बाबतीत जागतिक ऑनलाइन ग्राहकांपैकी जवळपास 49 टक्के ग्राहक गुंतवणुकीचा निर्णय घेण्यासाठी स्वत:वर विश्वास ठेवतात, असेही यात दिसून आले आहे.सामान्य ग्राहकांच्या तुलनेत नेटसॅव्ही भारतीय ग्राहकच गुंतवणुकीचा निर्णय स्वतंत्रपणे घेतात. नेल्सन इंडियाचे संचालक सुभाष चंद्र यांच्या म्हणण्यानुसार सरासरी ग्राहकांच्या तुलनेत भारतातील ऑनलाइन ग्राहक हे निर्णय घेताना दुसºयांवर कमी प्रमाणात विसंबून असतात. 16 टक्के जणांनी आर्थिक निर्णय घेताना मित्र, नातेवाईक आणि सहकाºयांची मदत घेत असल्याचे म्हटले आहे. जागतिक पातळीवर जवळपास 20 टक्के जणांनी आर्थिक नियोजनकाराकडून सल्ला घेत असल्याचे तर 18 टक्के जणांनी या सल्ल्यासाठी मित्र, नातेवाईक किंवा सहकाºयांवर अवलंबून असल्याचे म्हटले असल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे.
64 टक्के भारतीय ग्राहकांनी अव्वल चार गुंतवणूक वर्गामध्ये म्युच्युअल फंडाला सर्वाधिक पसंती दिली आहे. त्यापाठोपाठ धातू (63 टक्के), समभाग (56 टक्के) आणि रोखे (40 टक्के) हे गुंतवणुकीचे पर्याय ऑनलाइन भारतीय ग्राहकांच्या जास्त पसंतीचे आहेत. म्युच्युअल फंडांची वाढत्या लोकप्रियतेमुळे ऑनलाइन ग्राहकांच्या दृष्टीने म्युच्युअल फंड हे एक महत्त्वाचे गुंतवणूक माध्यम ठरले आहे.
पारंपरिक व गुंतवणुकीची गरज म्हणून भारतीय नेटसॅव्हींनी मौल्यवान धातूंमधील गुंतवणुकीलाही पसंती दिली आहे. नेल्सनने 56 देशांमधील 28 हजार इंटरनेट ग्राहकांचा जागतिक पातळीवर अभ्यास केला असून 42 टक्के ऑनलाइन भारतीय ग्राहक गुंतवणूक करीत असल्याचे यात दिसून आले आहे. इंटरनेट सॅव्ही असतानाही जवळपास 77 टक्के आॅनलाइन ग्राहकांनी प्रत्यक्ष बॅँकेत जाऊन व्यवहार करण्यास जास्त पसंती दिली.
शहरी भागातील ग्राहक इंटरनेटसॅव्ही असूनही आजही ते प्रत्यक्ष शाखेत जाऊन बॅँक व्यवहार करणे पसंत करतात. ऑनलाईन व्यवहार सुरक्षितपणे पार पडतील की नाही, या धास्तीमुळे ग्राहकांना प्रत्यक्ष बॅँकेत जाऊन व्यवहार करणे जास्त सोयीस्कर वाटते असेही ते म्हणाले.
‘नेल्सन’चे सर्वेक्षण
- ऑनलाइन व्यवहार सुरक्षित पार पडतील की नाही, याची ग्राहकांना भीती
- फक्त पाच पैकी दोन म्हणजेच 41 टक्के ग्राहक स्वत:च घेतात निर्णय
- म्युच्युअल फंड, धातू, समभाग वा रोखे या पसंतीच्या पर्यायांमध्ये गुंतवणूक
- अव्वल चार गुंतवणूक वर्गामध्ये 64 टक्के ग्राहकांची एमएफला अधिक पसंती