आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Online Shopping Hit During Diwali And Festive Season

दिवाळीच्‍या खरेदीची ऑनलाइन आतषबाजी, 250 टक्‍क्‍यांनी वाढीचा अंदाज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दिवाळीत बाजारात जाऊन खरेदी करण्याचा एक वेगळाच आनंद असतो; परंतु खरेदीसाठी उडणारी झुंबड आता ब-याच जणांना नकोशी झाली आहे. त्यातच इंधनाचा खर्च वाढल्याने आपल्या मोटारीने जाऊन वेळ आणि इंधन कशाला वाया घालवा, असाही विचार ग्राहक करू लागलेत. पण त्याहीपेक्षा सुरक्षिततेच्या कारणास्तवदेखील काही जणांनी ही खरेदी टाळली आहे. परंतु ऑनलाइन शॉपिंगवर विविध सवलतींची आतषबाजी सुरू असल्याने यंदा दिवाळीत याच खरेदीला ग्राहकांनी पसंती दिली आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत ऑनलाइन खरेदीत 250 टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज असोचेमने एका सर्वेक्षणात व्यक्त केला आहे

भरभरून मिळत असलेल्या सवलतींबरोबरच इंधनांच्या वाढलेल्या किमती आणि ऑनलाइन खरेदीसाठी असलेले असंख्य पर्याय यामुळे ऑनलाइन खरेदीचा कल वाढत आहे. त्यातूनही मोठ्या महानगरांमध्ये दुकानात जाऊन खरेदी करण्यामध्ये होणारी गैरसोय तसेच मुख्यकरून सुरक्षेच्या कारणास्तव बहुतांश लोकांनी ऑनलाइन खरेदीलाच पसंती दिलेली असल्याचे असोचेमचे महासचिव डी.एस. रावत यांनी सांगितले.
असोचेमने दिल्ली, लखनऊ, कोलकाता, चंदिगड, डेहराडून, पुणे, मुंबई, अहमदाबाद, हैदराबाद, कोचिन, चेन्नई, उदयपूर, जयपूरसारख्या मोठ्या शहरांतील बाराशे व्यापा-यांकडून मिळालेल्या प्रतिसादामध्ये सणासुदीच्या काळात ऑनलाइन खरेदीत 250 टक्क्यांनी वाढीचा अंदाज असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे. यंदाच्या ऑक्टोबर महिन्यात महत्त्वाच्या शहरांतील दुकानदारांनी ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून पाच हजार कोटींची विक्री केल्याचे रावत यांनी सांगितले.


या खरेदी/ विक्रीला पसंती मिळणार

भेटवस्तू 58%
इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स 41%
कपड्यांच्या अ‍ॅक्सेसरीज 36%
तयार कपडे 36%
गृहोपयोगी वस्तू 16%
संगणक 33%
हॉटेल खोल्या 20%
खेळणी 16%
दागिने 15%
सौंदर्य उत्पादने 12%
आरोग्य उत्पादने 12%


ऑनलाइन खरेदीचे फायदे

०घरपोच सेवेमुळे वेळेची बचत, दिवसाच्या 24 तासात कधीही खरेदी शक्य, गर्दीत न जाता घरच्या घरी सुलभ खरेदी, उत्पादनांची तुलना करणे शक्य
०दिल्लीतील जवळपास 71 टक्के इंटरनेटसॅव्ही ग्राहकांनी दिवाळीत ऑनलाइन खरेदी, तर 21 टक्के ग्राहकांनी पारंपरिक खरेदीला पसंती दिली आहे.
०गेल्या वर्षात 55 टक्के मुंबईकरांनी दैनंदिन खरेदी इंटरनेटवरून केली असून यंदा हे प्रमाण 69 टक्क्यांपर्यंत जाईल.